गोरखपूर - उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथील बाबा राघवदास (बीआरडी) मेडिकल कॉलेजमधील मुलांच्या मृत्यूच्या घटना अद्यापही थांबलेल्या नाहीत. गेल्या आठवड्यात बुधवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत येथे उपचारांसाठी आलेल्या सुमारे 30 मुलांचा मृत्यू झाला. 
 ज्या 30 मुलांचा मृत्यू झाला त्यापैकी 15  मुले ही अतिदक्षता विभागात भरती होती. तर अन्य 15 मुले बालरोग विभागात दाखल होते. गुरुवारी  25 नव्या रुग्णांना एनआयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. तर पीआयसीयूमध्ये 66 मुलांना दाखल करण्यात आले होते. 
मेडिकल कॉलेजच्या आकडेवारीवर नजर टाकली तर गुरुवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत 10 मुलांना भरती करण्यात आले होते. या दहा मुलांमधील 8 मुलांचा एआयसीयूमध्ये मृत्यू झाला. एनआयसीयूमध्ये येथे 36 मुलांना दाखल करण्यात आले होते. त्यातील दहा मुलांचा मृत्यू झाला. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात येथे 599 मुलांचा मृत्यू एनआयसीयू आणि पीआयसीयूमध्ये झाला होता.  
बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या महिन्यात चार दिवसांमध्ये ६९ मुलांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयाच्या नोंदीनुसार १० ऑक्टोबर रोजी १९, नऊ तारखेला १८, आठ तारखेला २० आणि १२ मुलांचा मृत्यू ७ ऑक्टोबरला झाला.
  ऑगस्टमध्ये २९० बालमृत्यू झाले. त्यापैकी एका दिवसात ६० मुलांचा मृत्यू झाला होता. मुलांना प्राणवायू न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप आहे. या रुग्णालयाला प्राणवायूच्या सिलिंडरचा पुरवठा करणाºयाचे बिल दिले न गेल्यामुळे त्याने पुरवठा थांबवला, असाही आरोप आहे. याबाबत गुन्हा दाखल झाला व चौकशीही झाली. आॅक्सिजन पुरवठादाराला अटकही झाली होती.