हवाई दलाचे विमान कोसळून अरुणाचलजवळ १३ जण ठार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 04:03 AM2019-06-04T04:03:50+5:302019-06-04T06:32:31+5:30

या विमानाचे अवशेष पायुम नावाच्या गावापाशी दिसल्याचे सांगण्यात आले. विमान बेपत्ता झाल्याचे समजल्यापासून नवे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सतत हवाई दलाच्या संपर्कात होते.

13 aircrafts killed in Arunachal crash | हवाई दलाचे विमान कोसळून अरुणाचलजवळ १३ जण ठार?

हवाई दलाचे विमान कोसळून अरुणाचलजवळ १३ जण ठार?

googlenewsNext

गुवाहाटी : भारतीय हवाई दलाचे मालवाहतूक विमान सोमवारी दुपारी कोसळून, त्यातील ८ कर्मचारी व ५ प्रवासी असे १३ जण जागीच मरण पावल्याचे वृत्त आहे. अर्थात हवाई दलाने या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही. हे विमान दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी जोरहाटहून निघाले होते. पण दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. 

या विमानाचे अवशेष पायुम नावाच्या गावापाशी दिसल्याचे सांगण्यात आले. विमान बेपत्ता झाल्याचे समजल्यापासून नवे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सतत हवाई दलाच्या संपर्कात होते. हे विमान आसामहून अरुणाचल प्रदेशकडे निघाले होते. हे रशियन बनावटीचे अँटोनोव एएन-३२ जातीचे विमान असून, यापूर्वीही अशा विमानांना अपघात झाले आहेत. या विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटताच हवाई दलाने विमानाचा शोध सर्वत्र सुरू केला होता. या कामात लष्कराचे जवान व इंडो-तिबेट बॉर्डर फोर्सचे पोलीसही मदत करीत होते. त्यानंतर संध्याकाळी हे विमान कोसळल्याचे स्पष्ट झाले. या विमानातील कर्मचारी व प्रवासी यांची नावे वा माहिती समजू शकलेली नाहीत. चीनच्या सीमेवरून जात असताना विमानाचा संपर्क तुटल्याने हा घातपात तर नाही ना, अशीही शंका व्यक्त केली गेली होती. हे विमान अरुणाचल प्रदेशातील मेचुका येथील लष्करी तळावरील धावपट्टीच्या दिशेने निघाले होते, असे हवाई दलातर्फे सांगण्यात आले.

कोसळलेले पाचवे विमान
यापूर्वी याच जातीची आणखी चार विमाने अशीच कोसळली होती. रशियाहून पाठवण्यात आलेले पहिलेच विमान मार्च १९८६ मध्ये कोसळले होते. ते विमान व त्यातील सातही जणांना पत्ताच लागला नव्हता. चार वर्षांनी केरळच्या पोनमुडी गावापाशी दुसरे विमान कोसळले. जून २00९ मध्ये अरुणाचल प्रदेशातच एक विमान कोसळून १३ जण मरण पावले. त्यानंतर या विमानांमध्ये सुधारणा केल्या. तरीही १२ जुलै २0१६ रोजी चेन्नईहून पोर्ट ब्लेअरला निघालेले विमान बेपत्ता झाले. त्याचा शोध लागला नाही.

Web Title: 13 aircrafts killed in Arunachal crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.