गुरुग्राम : रायन इंटरनॅशनल शाळेत झालेली प्रद्युम्न ठाकूर या विद्यार्थ्याची हत्या जेवढी खळबळजनक होती सीबीआयचा तपास देखील तितकाच खळबळजनक राहीला आहे. या प्रकरणात सीबीआयच्या पथकाने त्याच शाळेत शिकणा-या 11 वीच्या विद्यार्थ्याला अटक केली असून त्याला दुपारी बालन्यायलयात हजर केले जाणार आहे. परीक्षा आणि पालक-शिक्षक मीटिंग टाळण्यासाठी या विद्यार्थ्याने प्रद्युम्न ठाकूरची हत्या केली अशी खळबळजनक माहिती सीबीआयने दिली आहे. दुसरीकडे अटक केलेल्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी माझ्या मुलाला अडकवलं जात असल्याचा दावा केला आहे. 
अटक करण्यात आलेला आरोपी विद्यार्थी स्वभावाने तापट असल्याची माहिती आहे. प्रद्युम्नची हत्या झाली त्यावेळी हा विद्यार्थी शाळेच्या बाथरूमध्ये उपस्थित होता, असा संशय सीबीआयच्या तपास पथकाला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर या विद्यार्थ्यावर संशय बळावला. त्यानंतर 11 वीच्या सर्व विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात आली कारण फुटेजमध्ये विद्यार्थ्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. चौकशीनंतर सीबीआय पथकाने आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं. 
दरम्यान, माझा मुलगा निर्दोष असून त्याला या प्रकरणात अडकवलं जात असल्याचा दावा विद्यार्थ्याच्या वडिलांनी केला आहे. “माझ्या मुलानेच प्रद्युम्नच्या हत्येची माहिती सर्वात आधी शिक्षक आणि शाळेच्या माळ्याला माहिती दिली होती,” असंही त्याच्या वडिलांनी सांगितलं. 'सीबीआयने मंगळवारी रात्री उशिरापर्यंत माझी आणि मुलाची चौकशी केली. त्यानंतर मुलाला ताब्यात घेतलं. सीबीआयने आधी पण त्याची चार-पाच वेळा चौकशी केली होती. शिवाय मुलाच्या स्कूलबॅगसह इतर सामानही जप्त केलं होतं. शिवाय गुरुग्राम पोलिसांनीही तपासादरम्यान सीआरपीसीचं कलम 164 अंतर्गत त्याचा जबाब नोंदवला आहे, असंही ते म्हणाले. याविरोधात मी गुरुग्राम कोर्टात दाद मागण्याच्या तयारीत आहे, असंही विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितलं.
काय आहे प्रकरण?
8 सप्टेंबर रोजी गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलच्या शौचालयात प्रद्युम्न ठाकूरची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती.  याप्रकरणी स्कूल बसचा कंडक्टर अशोक कुमारसह तीन जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी अशोक कुमारने हत्या केल्याची कबुली दिली होती. पण नंतर कोर्टात त्याने जबाब फिरवला. दबावात येऊन मी हत्या केल्याची कबुली दिली होती, असं अशोक कुमारने सांगितलं.