लखनऊ, दि. 13 - दुबईतील आर्टिस्ट झुल्फिकार हुसैन पंतप्रधान नरेंद्र मोदींचं 110 फूट उंच कटआऊट तयार करत आहे. नरेंद्र मोदी सरकार पुढील 110 वर्ष सत्तेत राहावं यासाठी 110 फूट उंचीचं हे कटआऊट तयार केलं जात आहे. नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाला हे कटआऊट भेट म्हणून दिलं जाणार आहे. खास हे कटआऊट तयार करण्यासाठी 50 वर्षीय झुल्फिकार हुसैन दुबईहून उत्तर प्रदेशला आले आहेत. माजी भाजपा नगरसेवक निरपेंद्र पांडे यांच्या विनंतीवरुन झुल्फिकार हुसैन यांनी हे कटआऊट तयार करायला घेतलं आहे. 

17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे. मोदींच्या वाढदिवशी हे कटआऊट तयार होऊन, लखनऊमधील भाजपा कार्यालयासमोर उभं राहिल अशी अपेक्षा झुल्फिकार हुसैन यांनी व्यक्त केली आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसानिमित्त 1500 किलो लाडू आणि 105 किलो वजनाची घंटा भेट म्हणून देण्यात येणार आहे. 

'माझ्यासाठी हे एखादं स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे. त्यांची स्वत: भेट घेऊन ही भेट त्यांना द्यावी अशी माझी इच्छा आहे', असं झुल्फिकार हुसैन यांनी सांगितलं आहे. 'कट-आऊटप्रमाणे हे सरकारदेखील पुढील 110 वर्ष सत्तेत राहावं अशी माझी इच्छा आहे', असंही झुल्फिकार हुसैन बोलले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनादेखील अशाच प्रकारचं कट-आऊट भेट करण्याची इच्छा झुल्फिकार हुसैन यांनी व्यक्त केली आहे. 

'मी एक कलाकार आहे. एखाद्याच्या विचारसरणीमुळे मी प्रभावित होत नाही. लोकांनीही माझ्या धर्माचा संबंधी याच्याशी जोडू नये अशी माझी इच्छा आहे', असं झुल्फिकार हुसैन यांनी सांगितलं आहे. झुल्फिकार हुसैन यांनी दुबईत जाऊन स्थायिक होणयाआधी बहुजन समाज पक्षाचे नेते मायावती, कानसीराम आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंग यादव यांचंही कट-आऊट तयार केलं आहे. झुल्फिकार हुसैन दुबईत ऑईल पेंटिग आर्टिस्ट म्हणून काम करतात. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी काम करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे. आपले मित्र  निरपेंद्र पांडे यांना त्यांनी यासाठी श्रेय दिलं आहे. 

'1985 रोजी मी जेव्हा चित्रपटांचे पोस्टर पेंट करायचो तेव्हा आमच्या मैत्रीला सुरुवात झाली. 1998 रोजी निरपेंद्र पांडे यांनी मला तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा कट-आऊट तयार करायला सांगितलं होतं', असं झुल्फिकार हुसैन यांनी सांगितलं.