संत साहित्याचे अभ्यासक यशवंत पाठक यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:56 AM2019-03-24T00:56:14+5:302019-03-24T00:56:51+5:30

संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, साहित्यिक आणि निरूपणकार प्रा. डॉ. यशवंत त्र्यंबक पाठक यांचे शनिवारी (दि.२३) पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते.

 Yashwant Pathak, a saint literature scholar, passed away | संत साहित्याचे अभ्यासक यशवंत पाठक यांचे निधन

संत साहित्याचे अभ्यासक यशवंत पाठक यांचे निधन

Next

नाशिक : संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, साहित्यिक आणि निरूपणकार प्रा. डॉ. यशवंत त्र्यंबक पाठक यांचे शनिवारी (दि.२३) पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. नाशिक अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे अंगणातले आभाळ अनंतात विलीन झाले आहे.
पाठक यांच्या पश्चात पत्नी ज्योत्स्ना, दोन विवाहित कन्या आणि नातवंडे असा परिवार आहे. सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ कवी किशोर पाठक यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. यशवंत पाठक यांच्या आकस्मिक निधनाने साहित्य, शैक्षणिक व अध्यात्म क्षेत्रात शोककळा पसरली आहे. प्रख्यात कीर्तनकार गौतमबुवा पाठक यांच्या कुटुंबीयात जन्म घेतलेल्या पाठक यांना घरातूनच अध्यात्माचा वारसा लाभला होता. यशवंत पाठक यांनी मनमाड येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या महाविद्यालयात ३५ वर्षे अध्यापन केले.
कीर्तन परंपरा आणि मराठी साहित्य या विषयावर पुणे विद्यापीठातून पीएच.डी. संपादन केलेल्या पाठक यांनी पुढे पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानदेव अध्यासनाचे प्रमुख म्हणून ९ वर्षे काम पाहिले. त्यांची पंचवीस पुस्तके, विविध संपादने तसेच विविध गौरव गं्रथांमध्ये संशोधन लेखन प्रसिद्ध झाले आहे. प्रामुख्याने, ब्रह्मगिरीची सावली, नक्षत्रांची नाती, मैत्रीचा मोहर, तुकारामांचे निवडक अभंग, समर्थांची स्पंदने, अमृताची वसती, आभाळाचे अनुष्ठान, चंदनाची पाखर, पसायदान, कीर्तन : प्रयोगविचार, मातीचं देणं, संचिताची कोजागरी, कैवल्याची यात्रा, चंद्राचा एकांत, आनंदाचे आवार, पहाटसरी, नाचू कीर्तनाचे रंगी, अंगणातले आभाळ अशी ग्रंथसंपदा आहे. त्यांच्या चार पुस्तकांना महाराष्टÑ शासनाचे सर्वोत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. याशिवाय, त्यांना डॉ. निर्मलकुमार फडकुले पुरस्कार, संत ज्ञानदेव पुरस्कार, संत विष्णुदास कवी पुरस्कार, उत्तुंग पुरस्कार, निर्भय पुरस्कार, संत साहित्य पुरस्कार, संत सेवा पुरस्कार आदी पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले होते. गोवा, पणजी येथे झालेल्या कीर्तन संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. याशिवाय, त्यांनी गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक, सर्व धर्म कीर्तन परिषदेचे स्वागताध्यक्ष आदी पदेही भूषविली. आकाशवाणी व दूरदर्शनवरील विविध चर्चा, संवादात त्यांचा सहभाग असे. १९९९ मध्ये नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने झालेल्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे ते अध्यक्ष होते. याशिवाय, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांमध्येही त्यांचा विविध परिसंवादांमध्ये सहभाग असे. अनेक सप्ताहांमध्ये त्यांची निरूपणे, प्रवचने होत असत. अतिशय प्रासादिक आणि रसाळ निरूपणशैलीमुळे ते महाराष्टÑात परिचित होते. त्यामुळेच अनेक नामवंत व्याख्यानमालांमध्ये त्यांना वक्ते म्हणून निमंत्रित केले जायचे. त्यांच्या निधनाने संत साहित्याचा अभ्यासक आणि ज्येष्ठ सारस्वत हरपला आहे. नाशिक अमरधाममध्ये दुपारी शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याप्रसंगी साहित्य, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, नागरिक उपस्थित होते.
 

Web Title:  Yashwant Pathak, a saint literature scholar, passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.