खरेच का आहे ‘थिंक टँक’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 12:54 AM2017-09-24T00:54:16+5:302017-09-24T00:54:21+5:30

What is really a 'think tank'? | खरेच का आहे ‘थिंक टँक’?

खरेच का आहे ‘थिंक टँक’?

googlenewsNext

साराश
किरण अग्रवाल
नाशिक महापालिकेत सत्ता असूनही भाजपाला डोके वर करता येऊ नये, अशी नाकेबंदी शिवसेना व अन्य विरोधी पक्षीयांकडून केली गेलेली दिसत आहे. यावर उपाय म्हणून शिवसेनेला नामोहरम करण्यासाठी भाजपा सदस्यांचा अभ्यासवर्ग घेण्यात आला असून, पक्षाची कथित ‘थिंक टँक’ कामाला लागल्याचे सांगितले जात आहे. परंतु विचारांशी असलेली बांधिलकी कधीचीच सुटल्याच्या परिस्थितीत कुणाचा सल्ला ऐकला जाणार? आणि मुळात तसा तो देण्याचा अधिकार असलेली मंडळी तरी कुठे उरली आहे या पक्षात?
चारांची लढाई विचारांनीच लढली जाते, त्यामुळे त्यासाठी वैचारिक मार्गदर्शन करणारे नेतृत्व अगर तज्ज्ञ मंडळ असणे गरजेचे असते. परंतु राजकारणासारख्या क्षेत्रात अलीकडे विचार किंवा बांधिलकीची बाब बाजूला पडून व्यवहाराधारित भूमिका घेतल्या जाऊ लागल्याने असल्या वैचारिक तज्ज्ञांची वा दिशादर्शकांची गरजच मुळी मोडीत निघाल्यासारखी अवस्था आहे. अशा स्थितीत वरचढ होऊ पाहणाºया सहयोगी शिवसेनेला आटोक्यात ठेवण्यासाठी भाजपाची ‘थिंक टँक’ पुढे सरसावल्याचे वृत्त आल्याने त्याबाबत आश्चर्य वाटून जाणे स्वाभाविक ठरले आहे.  सत्ता असून व सभागृहात सुस्पष्ट बहुमताचा आकडा असूनही नाशिक महापालिकेत भाजपाला आपला वरचष्मा अगर प्रभाव सिद्ध करता येऊ शकलेला नाही. याला प्रामुख्याने दोन बाबी कारणीभूत आहेत, त्यापैकी एक म्हणजे भाजपाकडे ज्येष्ठ वा अनुभवी म्हणावेत असे प्रतिनिधी तुलनेने कमी आहेत. त्याउलट विरोधी पक्षांकडील अशा प्रतिनिधींची संख्या मोठी आहे. त्यामुळे विरोधातील ‘बड्यां’नी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर चर्चा करायची किंवा त्यांचा मुद्दा खोडून काढायचा तर तशी क्षमता असणाºयाची उणीव भाजपाला प्रकर्षाने जाणवते. दुसरे म्हणजे, केंद्रात व राज्यात सोबत असले तरी नाशिक महापालिकेत भाजपा-शिवसेना परस्परविरोधात आहेत. अर्थात, वरिष्ठ पातळीवरील ‘सोबत’ही किती कामचलाऊ आहे ते वेळोवेळी दिसून येत असते हा भाग वेगळा; परंतु नाशकात सत्तेत सोबती नसल्याने शिवसेना उघडपणे व आक्रमकतेने भाजपाशी दोन हात करण्याची भूमिका घेत असते. त्यामुळे काही करणे तर दूर; पण प्रत्येकवेळी शिवसेनेला आवरण्यातच भाजपाची मुश्किली होते. परिणामी सत्ता असूनही तिचा प्रभाव निर्माण करण्यात अडथळे उत्पन्न होत असल्याची वास्तविकता आहे. वर्ष होत आले तरी हीच स्थिती कायम असल्याने त्यातून बाहेर पडण्यासाठी अखेर भाजपा नगरसेवकांना रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत नेऊन त्यांचा अभ्यासवर्ग घेण्यात आला. त्याचा तत्काळ परिणाम गेल्या महासभेत दिसूनही आला. कायम ‘मौना’त राहणेच पसंत करणाºया अनेक नगरसेवकांनी या सभेत बोलण्यासाठी बोट वर केल्याचे पहावयास मिळाले. इतकेच काय, काही विषयांचे प्रस्ताव शिवसेनेने दिलेले असताना त्यावर कडी करीत भाजपाने त्या त्या विषयांना अगोदर तोंड फोडत त्याचे श्रेय स्वत:कडे घेण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसून आले. त्यामुळे अभ्यासवर्ग कामी आला, असे निश्चितपणे म्हणता यावे. पण त्याचसोबत भाजपाची रणनीती निश्चित करण्यासाठी ‘थिंक टँक’ सक्रिय झाल्याचे म्हटले गेल्याने, खरेच या पक्षाकडे अशी काही व्यवस्था अस्तित्वात आहे का अथवा उरली आहे का, असा प्रश्न उपस्थित होऊन गेला आहे.
मुळात ‘थिंक टँक’ म्हणजे काय, तर संबंधित क्षेत्रात विचार मांडणारे, कल्पना सुचविणारे किंवा समस्यांवर उपाय सांगणारे तज्ज्ञ मंडळ. पण जिथे विचारांशी फारसा संबंधच उरला नाही, तेथे तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची वेळ येईल तरी का, हाच खरा प्रश्न आहे. महापालिकेतील राजकारणाने विचाराचे बोट कधीचेच सोडून दिले आहे. आता जे काही चालते ते ‘वरून कीर्तन आतून तमाशा’सारखे आहे. पूर्वी सभागृहात बंडोपंत जोशी यांच्यासारखे नेते होते, तेव्हा अभ्यास करून, विशिष्ट भूमिका घेऊन बोलले जाई. महासभा होण्यापूर्वी पक्षाची बैठक होऊन कोणत्या विषयावर काय भूमिका घ्यायची हे ठरत असे. पक्षीय विचारधारेशी बांधिलकी जपत एखादा विषय लावून धरला जात असे. जोशींसारख्या नेत्यांच्या विचाराला, शब्दाला सभागृहात मान होता तसा सभागृहाबाहेर पक्षातही तो होता. महापालिकेच्या पहिल्या ‘टर्म’मधील लक्ष्मण सावजी, विजय साने व प्रा. सुहास फरांदे ‘त्रिकूट’ याच विचारधारेने अनेक प्रश्न उपस्थित करताना व त्यासाठी झगडताना पहावयास मिळे. कारण, कसल्या का बाबतीत असेना, पक्षीय भूमिका निश्चित असत. नंतरच्या काळात या भूमिकांचाच चेंडू झालेला दिसून आला. विचारांची बांधिलकी क्षीण होत गेली. विचारांची जागा ‘व्यवहारा’ने घेतल्याने व दिवसेंदिवस सारी यंत्रणा खासगीकरणाच्या आहारी जाऊ पहात असल्याने सारेच मुखत्यार झालेत. त्यामुळे एक तर ‘थिंक टँक’ निकाली निघाली आणि दुसरे म्हणजे, तशी अधिकारवाणीने कान धरणारा, सुनावणारा-सुचवणाराही कुणी पक्षात उरला नाही. सारेच नेते झाले म्हटल्यावर कोण कुणाचे ऐकणार? त्यात पक्षीय ध्येय-धोरण अथवा वैचारिकतेचे धडे गिरवत सभागृहात पोहचलेले अगदी नगण्य आहेत. बाकी अधिकतर सत्तेपर्यंत पोहचवण्यासाठी इकडून-तिकडून गोळाबेरीज करून घेतलेले म्हणजे अन्य पक्षातून आयात झालेले व काही नवखे. त्यामुळे उठता-बसता प्रत्येक विषयावर ‘चिंतन’ करण्याची भाजपाची खासीयत असली तरी, या नव्या लोकांना ते अद्याप अंगवळणी पडलेलेच नाही. या साºया प्रकारात विचार हरविल्याने स्वाभाविकच ‘थिंक टँक’ लयास गेली. ना कुणी सल्ला देणारे, ना कुणी तो घेणारे, अशी सारी अवस्था.  भाजपात ‘थिंक टँक’ उरली नसल्याचे निदर्शनास येण्याचे आणखी एक कारण म्हणजे स्वीकृत सदस्य निवडीवरून सुरू असलेली पक्षांतर्गत हमरीतुमरी. महापालिकेत सत्ता मिळवून सात-आठ महिने उलटले तरी या पक्षाला साधा स्वीकृत सदस्य निवडीचा पक्षांतर्गत प्रश्नही सोडवता आलेला नाही. एकतर इच्छुक भरपूर, त्यात शहरातील पक्षाच्या तीनही आमदारात त्यासाठी सुरू असलेला संघर्ष; त्यामुळे कोणत्याही नावावर एकमत होऊ शकलेले नाही. तज्ज्ञ सल्लागार खरेच अस्तित्वात असते तर पक्षाच्या वैचारिक भूमिकेतून ही निवड प्रक्रिया आतापर्यंत मार्गी लागली असती. त्यातही पक्षाच्या निष्ठावंताना, जे निवडून येऊ शकत नाहीत त्यांना न्याय देण्याची भूमिका दिसून आली असती; परंतु आतातर भलत्याच नावांची चर्चा आहे. तेव्हा शिवसेनेशी झगडण्यासाठी म्हणून का होईना भाजपात ‘थिंक टँक’ अस्तित्वात आली असेल तर तिने सर्वप्रथम सदरचा प्रश्न सोडवावा. तो सोडवताना पारंपरिक निष्ठावंतांच्या नावांचाही निर्णय करता येत नसेल तर कला, साहित्य, उद्योग, क्रीडा आदी प्रकारातील लोकांना संधी देऊन भाजपाचा वेगळा विचार लोकांसमोर कृतीत उतरवून दाखवता येईल. तेव्हा यातील काय होते हेच आता पाहायचे.

 

Web Title: What is really a 'think tank'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.