नाशिककरांच्या अपेक्षांवर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:48 AM2019-06-17T00:48:28+5:302019-06-17T00:48:55+5:30

अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रविवारी (दि.१६) राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. मात्र या विस्तारात नाशिकच्या वाट्याला एकही मंत्रिपद न आल्याने नाशिककरांच्या अपेक्षांवर पुन्हा एकदा पाणी फिरले. नाशिकला प्रतिनिधित्व मिळेल, असे अनेकदा ठामपणे बोलले गेले मात्र मंत्रिपदाने नाशिकला सातत्याने हुलकावणी दिली.

 Water on the expectations of Nashikar | नाशिककरांच्या अपेक्षांवर पाणी

नाशिककरांच्या अपेक्षांवर पाणी

Next

नाशिक : अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रविवारी (दि.१६) राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. मात्र या विस्तारात नाशिकच्या वाट्याला एकही मंत्रिपद न आल्याने नाशिककरांच्या अपेक्षांवर पुन्हा एकदा पाणी फिरले. नाशिकला प्रतिनिधित्व मिळेल, असे अनेकदा ठामपणे बोलले गेले मात्र मंत्रिपदाने नाशिकला सातत्याने हुलकावणी दिली.
गेल्या विधानसभा निवडणुकीत शहरातील चारपैकी तीन जागा भाजपाला मिळाल्या तर चांदवड-देवळा मतदारसंघातून राहुल आहेर विधानसभेत निवडून गेले. त्यामुळे जिल्ह्यातून एकाची मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशी नाशिककरांना अपेक्षा होती. याशिवाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही खासदार निवडून आणण्यातही भाजप आमदारांची भूमिकादेखील महत्त्वाची राहिली. त्यामुळे नाशिकचा विचार होऊ शकेल, अशी दाट शक्यता होती. मात्र नाशिककरांच्या वाट्याला पुन्हा निराशाच आली.
गेल्या चार वर्षांपासून नाशिकच्या मंत्रिपदाचा विषय सातत्याने चर्चेत राहिला. मंत्रिमंडळात स्थान मिळविण्यासाठी तीनही आमदारांमध्ये प्रचंड लॉबिंग सुरू होेते. त्यामुळे मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागते याकडे नाशिककरांचे लक्ष लागले होते. परंतु त्यांच्यातील अंतर्गत स्पर्धाच मारक ठरल्याने नाशिकचे मंत्रिपद हुकले, अशी चर्चा लपून राहिली नाही. आपणालाच मंत्रिपद मिळेल, असा दावा तीनही आमदारांकडून वेळोवेळी केला गेला. त्यातून त्यांच्यातील अंतर्गत हेवेदावेदेखील समोर आले. आपले अस्तित्व दाखविण्यासाठी एकमेकांना शह देण्याची संधी त्यांनी सोडली नाही. त्यामुळे वरवर दिसत नसले तरी त्यांच्यातील दुरावा कायम राहिला.
मंत्रिमंडळ विस्ताराची जेव्हा जेव्हा चर्चा झाली तेव्हा नाशिककरांच्या नजरा मुंबईकडे लागल्या होत्या. साडेचार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या विस्तारातही संधी मिळालेली नाही. यामुळे नाशिककरांच्या अपेक्षांवर पाणी फिरले गेले अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली आहे.
पालकमंत्र्यांकडे लॉबिंग
मंत्रिमंडळातील वजनदार नेते आणि भाजपाचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या भूमिकेवरही मंत्रिपद अवलंबून असल्याची चर्चा होती. सानप हे पालकमंत्र्यांच्या जवळचे मानले जात असल्याने त्यामुळे त्यांची किमान राज्यमंत्रिपदी तरी वर्णी लागेल, असे बोलले जात होते, मात्र हेही दिवास्वप्नच ठरले.
तिघांचे भांडण, चौघांचेही नुकसान
४शहरातील भाजपाच्या तीनही आमदारांमध्ये असलेली गटबाजी लक्षात घेता आमदार राहुल अहेर यांच्या नावावर एकमत होऊ शकते असेदेखील बोलले गेले. माजी मंत्री दौलतराव अहेर यांचे चिरंजीव आणि ग्रामीण भागातील तरुण चेहरा म्हणून राहुल अहेर यांच्याकडे पाहिले जाते. मात्र रविवारी झालेल्या मंत्रिमंडळात यापैकी कुणाचीही वर्णी लागली नाही.

Web Title:  Water on the expectations of Nashikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.