ठळक मुद्दे कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त ३० किलोपर्यंतचे धान्य कमी दिले जात दुकानदारांना कमी धान्य देण्याच्या कारणाचा मात्र उलगडा झालेला नाही

नाशिक : वाहतूक ठेकेदाराकडून रेशन दुकानदारांना कमी धान्य दिले जात असेल तर दुकानदारांनी थेट तक्रार करावी. तक्रार प्राप्त झाल्यास ठेकेदारावर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी कासार यांनी दिला आहे. ‘लोकमत’मध्ये यासंदर्भात मंगळवारी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पुरवठा खात्याने ठेकेदाराला याबाबत विचारणा केली आहे.
शहरातील अनेक धान्य दुकानांना अन्नधान्य पुरविताना वाहतूक ठेकेदाराकडून कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त ३० किलोपर्यंतचे धान्य कमी दिले जात असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. कमी धान्य देऊनही ठेकेदाराकडून पोहोच पावतीवर पूर्ण धान्य मिळाल्याची नोंद करण्यासाठी दुकानदारांना भाग पाडले जाते. त्यासंदर्भात दुकानदारांकडून विचारणा झाल्यास पुरवठा खात्याकडे तक्रारी करा, असा उलट सल्ला ठेकेदाराकडून दिला जात असल्याचेही दुकानदारांचे म्हणणे आहे. प्रत्येक दुकानदाराला धान्य कमी मिळत आहे. दुसरीकडे शासनाकडून मंजूर धान्याचा पुरेपूर साठा ठेकेदाराच्या ताब्यात दिला जात असतानाही दुकानदारांना कमी धान्य देण्याच्या कारणाचा मात्र उलगडा झालेला नाही. त्यामुळे दर महिन्याला शेकडो क्विंटल धान्याचा घोळ घातला जात असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी कासार यांनी, दुकानदारांनी जेवढे धान्य मिळेल तेवढ्याच धान्याची पोहोच ठेकेदाराला द्यावी. कोणत्याही परिस्थितीत कमी धान्य घेऊ नये, असे आवाहन केले आहे. दुकानदारांच्या तक्रारींची दखल घेण्यात आली असून, ज्या दुकानदारांना कमी धान्य मिळाले त्यांनी नि:संकोचपणे तक्रार करावी. प्रसंगी ठेकेदारावर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. शहरातील ९६ रेशन दुकानदारांकडे असलेल्या अंत्योदय योजनेच्या लाभार्थींसाठी ११७ क्विंटल साखर वाटप करण्यासाठी वाहतूक ठेकेदाराकडे देण्यात आली व त्याने संपूर्ण साखर वाटप केली आहे. त्यामुळे ज्या दुकानदारांना अजूनही साखर मिळालेली नसेल त्यांनी थेट तक्रार करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.