अध्यात्माचा शोध घेण्याचा प्रयत्न म्हणजेच वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:27 AM2019-07-12T00:27:46+5:302019-07-12T00:28:09+5:30

युगे अठ्ठावीस विटेवरती उभा राहून भक्तांची, लेकरांची वाट पाहणाऱ्या विठ्ठलाच्या प्राप्तीसाठी मानवाचे मन व्याकूळ होते. हे मन जणू काही भक्तिप्रेमाच्या उत्कटतेतून परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी अधीर झालेले असते, आसुसलेले असते. हे आसुसलेपण वारीत पहायला मिळते. एकप्रकारे परमेश्वराच्या भेटीची आतुरता वारीत असते.

Trying to search for Spirituality means Vari | अध्यात्माचा शोध घेण्याचा प्रयत्न म्हणजेच वारी

अध्यात्माचा शोध घेण्याचा प्रयत्न म्हणजेच वारी

Next

अण्णासाहेब मोरे
युगे अठ्ठावीस विटेवरती उभा राहून भक्तांची, लेकरांची वाट पाहणाऱ्या विठ्ठलाच्या प्राप्तीसाठी मानवाचे मन व्याकूळ होते. हे मन जणू काही भक्तिप्रेमाच्या उत्कटतेतून परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी अधीर झालेले असते, आसुसलेले असते. हे आसुसलेपण वारीत पहायला मिळते. एकप्रकारे परमेश्वराच्या भेटीची आतुरता वारीत असते. अहिंसा, सत्य, पावित्र्य, इंद्रियनिग्रह, मनसंयम, नैतिकता, निर्मलता, मानवता उत्तम आचरणातून, मनोधारणेतून सर्व कल्याणाची भावना बळकट होते. अशाच प्रकारची भावना वारीत दिसून येते. जेथे सर्वकल्याणाची भावना आहे तेथे समानता, एकता आहे हेच खरे वारीचे तत्त्वज्ञान आणि अध्यात्म होय. अध्यात्म हे मानव जीवन व मानवी मनाच्या गरजेतून जिज्ञासेतून उदयास आले आहे. मानवाच्या संशोधन बुद्धीने विकसित केलेले साधना क्षेत्र किंवा साधना मार्ग यातून धर्म आणि तत्त्वज्ञान तयार झाले, असे म्हणता येईल. धर्म हे अध्यात्माचे व्यवहार्य आणि आचरणीय रूप आहे. भारतीय संस्कृतीत अनेक धर्म-पंथांचा उदय झाला. त्यात भागवत धर्म किंवा वारकरी सांप्रदाय हा सर्वसमावेशक मानला जातो. कारण त्याला सर्व जातीचे, धर्माचे लोक मानतात. वारी करणारा तो वारकरी होय. वारीमध्ये नियमितता असते. एकप्रकारे व्रत असते, जणूकाही वारी करणे हा वारकऱ्यांचा धर्मच आहे. माणूस म्हणून माणसाला जगण्यासाठी, अनुभवण्यासाठी धारण केलेले उत्तम आचारविचार, विधिनिषेध स्वत:मधल्या व सृष्टीत सामावलेल्या चैतन्याचा स्वानुभूतीने घेतलेला वेध होय. मानवाने त्यासाठी तयार केलेली प्रणाली व त्याचे नियम या सर्वांचा समन्वय म्हणजे धर्म होय. वारीमध्ये आपल्याला नियमही दिसतात आणि समन्वयदेखील दिसतो. धर्म आणि तत्त्वज्ञानाचा संगम म्हणजे अध्यात्म होय. या अध्यात्माचा शोध घेणाºया आणि त्याचा खरा धर्म समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजे वारी आहे. आत्म्याशी संवाद साधत आत्मविद्या आत्मसात करत करत ‘मी’पणा विसरण्याचा प्रयत्न म्हणजे वारी होय. वारी म्हणजे पराकोटीची श्रद्धा, भक्ती आणि ईश्वरी शक्तीची तेवढीच पराकोटीची ओढ आहे. दरवर्षी आषाढीची वारी निघते त्यात वारकरी नित्यनेमाने सहभागी होतात. या वारकºयांच्या सेवेसाठी हजारो हात पुढे येतात. हे सेवेकरीदेखील वारकरीच होय. वारीमध्ये वाटचाल करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक संकटे येतात. जसे ऊन, वारा, पाऊस तसेच अपघात आणि आजारपण अशा घटना घडतात; परंतु या दु:खाची कोणाला पर्वा नसते. दु:खाच्या समस्त संवेदनांना अनुभवताना दु:खरहित शाश्वत मानसिकता मिळविण्याचा मार्ग किंवा साधना म्हणजेच वारी असते. त्या पंढरीरायाच्या ओढीमागे भौतिक, आध्यात्मिक अशी कारणे आहेत. समस्त भौतिक दु:खदायी व्यापात राहूनही मन:शांती बरोबरच शरीरालाही प्रफुल्लित करणारी ही वारी म्हणजे अध्यात्म आणि आत्मदर्शनाचे प्रवेशद्वारच म्हणायला हवे. एकप्रकारे नराला नारायण बनविण्यासाठी केलेली ही भावयात्रा आहे. एक अध्यात्म विचारांचा हा प्रकार आहे. रोजच्या भौतिकव्यापाला तोंड देण्यासाठी हवी असणारी सकारात्मकता विश्वास वाढविणारी ही यात्रा आहे. माणसाची तृप्ती कधीही मर्यादित गोष्टींनी होत नसते. वास्तविक तृप्तीसाठी त्याला अनंत, अलौकिक अनुभवण्याचा ध्यास असतो. हा ध्यास त्याच्या माणुसपणाची निशाणी आहे. भागवत संप्रदायात सर्व कल्याणाची भावना आहे. समानता, एकता हेच खरे वारीचे तत्त्वज्ञान आणि खरे अध्यात्म आहे. आमच्या सर्व थोर संतांनी डोळस श्रद्धा शिकविली आहे. अमानवीयता, निरर्थक, कर्मकांड, पाखंड, देखावा, संकुचितपणा या विरोधात संतांनी आयुष्यभर लढा दिला. म्हणूनच वारीत सर्वकल्याण सर्वात्मकता, एकता आपसूकच दिसून येते. हजारो वारकरी आणि लाखो भाविकांनी विठुरायाला घातलेले पावसाचे साकडे निश्चित पूर्ण होते.
(लेखक दिंडोरीप्रणीत स्वामी समर्थ अध्यात्म केंद्राचे प्रमुख आहेत.)

 

 

Web Title: Trying to search for Spirituality means Vari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.