लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिक शहरात वाढत्या रहदारीचे नियोजन करण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत ट्रॅफिक वार्डनची योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार असून, त्यासाठी गृह विभागाला नियमावली करण्याचे आदेश राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले आहेत.
होमगार्डच्या धर्तीवर नाशिक शहरात ट्रॅफिक वार्डन (वाहतूक मदतनीस) योजना राबविण्याबाबत मंत्रालयात डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी राज्यात ठाणे व नांदेड आदी शहरांमध्ये ट्रॅफिक वार्डन हे मासिक मानधनावर वाहतूक पोलिसांना मदतीचे काम करत आहेत. नाशिक शहरातदेखील ५ सप्टेंबर २००४ रोजी पोलीस महासंचालकांच्या हस्ते ओळखपत्र वाटप करून ट्रॅफिक वार्डन योजना सुरू केली गेली होती. त्यांना ट्रॅफिकचे नियम आणि कायदेविषयक माहितीचे ९० दिवसांचे प्रशिक्षणसुद्धा देण्यात आले होते. मात्र २००९ नंतर ही योजना बंद करण्यात आल्याची बाब आमदार जयंत जाधव यांनी निदर्शनास आणून दिली. नाशिक शहराचा विस्तार, वाढती लोकसंख्या व वेगाने वाढणारी वाहनांची संख्या याचा विचार करून वाहतुकीच्या नियमनासाठी ट्रॅफिक वार्डनची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणीही जाधव यांनी केली. त्यावर डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले की, अमृत शहर अभियान आणि स्मार्ट सिटी योजनेंतर्गत असणाऱ्या सर्व शहरांमध्ये ट्रॅफिक वार्डनची सेवा देता येणे शक्य आहे. त्यासाठी गृह विभागाकडून नियमावली तयार करण्यात येईल. तत्पूर्वी नाशिक शहरात प्रायोगिक तत्त्वावर ट्रॅफिक वार्डनची योजना राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. या बैठकीस राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, अतिरिक्त पोलीस महासंचालक (परिवहन) आर. के. पद्मनाभन, पोलीस आयुक्त (परिवहन) अमिताभ कुमार, अतिरिक्त महामार्ग पोलीस आयुक्त विजय पाटील, महाराष्ट्र ट्रॅफिक वार्डन असोसिएशनचे समन्वयक संतोष शेलार आदी उपस्थित होते.