Traffic rush at the railway station | रेल्वेस्थानकावर प्रवाशांची तोबा गर्दी

नाशिकरोड : नाताळ सणाच्या सुट्या व नवीन वर्षाच्या आगमनानिमित्त बाहेरगावी येणाºया-जाणाºया प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याने नाशिकरोड रेल्वेस्थानक प्रवाशांनी फुलून गेले आहे.  नाताळ सणाच्या शाळा व महाविद्यालयांना सुट्या असल्याने तसेच नवीन वर्षाच्या आगमनानिमित्त अनेकांनी परगावी फिरण्यासाठी व देवदर्शनासाठी नियोजन केल्याने सध्या रेल्वेला प्रवाशांची तोबा गर्दी झाली आहे. यामुळे जवळपास सर्वच रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वेंना प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्याने रेल्वे येण्याच्या वेळेस नाशिकरोड रेल्वेस्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुलून जात आहे. प्रवाशांची गर्दी वाढल्याने तिकीट तपासणीस, बुकिंग, पार्सल, रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलीस या विभागावरील कामाचा ताण वाढला आहे. रेल्वेला वाढलेल्या प्रवाशांच्या गर्दीमुळे स्थानकावरील खाद्यपदार्थांच्या स्टॉलचा व्यवसायदेखील वाढला आहे. तसेच रिक्षा-टॅक्सी चालकांच्या व्यवसायाला देखील ‘अच्छे दिन’ आले आहेत.