Thirty First Sunday Enjoy: The New Year Celebration started by the youngster coming together at the Missal Point of Nashik. | थर्टी फर्स्ट संडे एन्जॉय : गुलाबी थंडीत नाशिकच्या मिसळ पॉइंटवर एकत्र येत तरुणाईकडून ‘न्यू इयर सेलिब्रेशन’ला स्टार्ट..!

ठळक मुद्देनाशिककर मोठ्या संख्येने घराबाहेर पडले शहरात निरव शांतता आज अनुभवयास येत आहे. नाशिककरांनी जवळचे नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य परिसराचे पर्यटनालाही पसंती दिली.

नाशिक : ‘थर्टी फर्स्ट’चा जल्लोष म्हणजे सरत्या वर्षाच्या आठवणींची शिदोरी सोबत घेत नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नाशिकमध्ये तरुणाईच्या उत्साहाला भरते आले आहे. २०१७चा अखेरचा रविवार सोबत वीकेण्डचाही शेवट अन् वर्षाचाही शेवट हा योगायोग यंदा जुळून आला आहे. ‘संडे’च्या सकाळी नाशिककर मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. गुलाबी थंडीची मजा लूटत तरुणाईने शहरालगतच्या ‘मिसळ पॉइंट’वर झणझणीत मिसळचा आस्वाद घेत ‘न्यू इयर सेलिब्रेशन’ला स्टार्ट केले.
नवीन वर्षाच्या स्वागत अन् जल्लोषासाठी मागील चार दिवसांपासूनच तरुणाईकडून विविध योजना आखल्या जात होत्या. शहरातील विविध महाविद्यालयांच्या कट्टे आणि व्हॉटस्अ‍ॅपच्या ग्रूपवर विविध भन्नाट क ल्पनांची देवाणघेवाणही सुरू झाली होती. एकूणच ‘न्यू इयर सेलिब्रेशन प्लान’ आखण्यात तरुणाई दंग झाल्याचे दिसून आले. कारण चालू वर्षाचा विकेण्डमुळे रविवार आल्याने महाविद्यालयांसह सर्वच शासकिय तसेच काही खासगी कार्यालये वगळता सर्वांना सुटी असल्याने संडेच्या सकाळापासूनच नाशिकमध्ये नववर्षाचा जल्लोष पहावयास मिळाला. यामुळे तरुणाईकडून फुल टू धमाल शहर व परिसरातील पर्यटन स्थळांवर केली जात आहे.

नाशिकच्या प्रसिध्द मिसळचा आस्वाद घेते ‘न्यू इयर सेलिब्रेशनचे प्लान’ पक्के

सकाळपासूनच तरुणाईने समुहाने एकत्र येत मिसळ पॉइंटवर गर्दी केली होती. चूलीवरील नाशिकच्या प्रसिध्द मिसळचा आस्वाद घेत गप्पा-टप्पांचा फड रंगत दिवसभराचे न्यू इयर सेलिब्रेशनचे प्लान पक्के केले. गंगापूररोड, मखमलाबाद, त्र्यंबकेश्वर रोड, शरणपूररोड, कॉलेजरोेड आदि परिसरातील मिसळ पॉइंट यामुळे गजबजले होते. थंडीची तीव्रता मिसळचा आस्वाद घेता घेता कमी झाली आणि तरुणाईचा उत्साह अधिक वाढला. यामुळे मित्र-मैत्रिणींचे समुह तसेच कौटुंबिक समुहदेखील विविध पर्यटन स्थळांवर भेटी देत उत्साहाने आनंद लुटताना दिसून आले. नाशिकमध्ये बारामाही पसंतीचा असणारा सोमेश्वर धबधबा परिसर तरुणाईने फुलला होता. धबधबा खळाळून वाहत नसला तरी या भागातील अल्हाददायक वातावरण आणि निसर्गसौंदर्य नाशिककरांना नेहमीच आकर्षित करत राहिला आहे. तसेच नाशिक शहरापासून अवघ्या दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या गंगापूर धरणाच्या परिसरातही आऊटींगसाठी तरुणाई पोहचली आहे. गोवर्धन शिवारातील वसंत कानेटकर उद्यानात विसावा घेत तरुणाईने सावरगावमार्गे गंगापूर धरणाचा बॅकवॉटर गाठला आहे. थर्टी फर्स्टच्या निमित्ताने या भागात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य परिसराच्या पर्यटनालाही पसंती
यंदा थर्टी फर्स्टचा जल्लोष तरुणाई अधिक उत्साहाने करत आहे. कारण गेल्या सहा दिवसांपासून शहराचा किमान तपमानाचा पारा घसरला असल्याने नववर्ष स्वागताला शीतलहरीची झालर मिळाली आहे. बोच-या थंडीमुळे वातावरण अधिक चांगले झाले असून नवीन वर्षाचा जल्लोष करताना तरुणाईचा उत्साह द्विगुणित झाला आहे. वर्षाचा वीकेण्ड असल्यामुळे बहुतांश निसर्गप्रेमी व पक्षीप्रेमी नाशिककरांनी जवळचे नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य परिसराचे पर्यटनालाही पसंती दिली. यामुळे नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य असलेल्या निफाड तालुक्यातील चापडगाव परिसर गजबजला होता.

शहरात निरव शंतता; रस्त्यांवर शुकशुकाट
रविवारची सुटी अन वर्षाचा वीकेण्ड असल्यामुळे नाशिककर मोठ्या संख्येने घराबाहेर पडले असून पर्यटनासाठी कुटुंबासमवेत शहरापासून शंभर किलोमीटर अंतरावरील पर्यटन स्थळांवर पोहचल्याने नाशिक शहरात निरव शांतता आज अनुभवयास येत आहे. यामुळे शहराचा मध्यवर्ती परिसर म्हणून ओळखल्या जाणा-या सीबीएस, शालिमार, मुंबईनाका, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, कॉलेजरोड, शरणपूररोड, पंचवटी, निमाणी या भागात जणू अघोषित संचारबंदी लागू झाली की काय, अशा शंका आल्यास नवल वाटू नये.


Web Title: Thirty First Sunday Enjoy: The New Year Celebration started by the youngster coming together at the Missal Point of Nashik.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.