विजय मोरे ।
नाशिक : समाजात मुलगा म्हणजे वंशाचा दिवा असा समज आहे़; मात्र एक नव्हे तर तब्बल वंशाला दोन दिवे मिळाले तरीही अवघे दीड किलो वजन असलेली ही बालके जगतीलच याची आई-वडिलांना खात्री नव्हती़ त्यामुळे पाच दिवसांनंतर मुलांची आशा सोडून ती गुपचूप आपल्या घरी निघून गेली़ जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू विभागातील डॉक्टर व परिचारिकांनी या मुलांचे पालकत्व घेऊन पन्नास दिवस सांभाळत त्यांना जीवदान दिले असून, त्या मातेचा शोध घेत बुधवारी तिच्याकडे बालके सुपूर्द करण्यात आली.
जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू (नवजात अर्भक कक्ष) विभाग अर्भक मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत आला असताना या विभागातील कर्मचाºयांनी जुळ्यांना दिलेले जीवदान ही प्रशंसनीय बाब ठरली आहे़ त्र्यंबकेश्वर या आदिवासी तालुक्यातील संगीता किसन धोंड या महिलेने पन्नास दिवसांपूर्वी दोन जुळ्या मुलांना जन्म दिला़ अर्थात यासाठी डॉक्टरांना तिचे सिझर करावे लागले़ त्यात दुर्दैव म्हणजे जन्माला आलेल्या दोन मुलांपैकी एक मूल हे १ किलो ४०० ग्रॅम, तर दुसरे १ किलो ५०० ग्रॅम होते़ आईने मुलांची प्रकृती सुधारेल या आशेवर पाच दिवस रुग्णालयात काढले मात्र शेवटी आशा सोडून ती आपल्या स्वगृही परतली़
जिल्हा रुग्णालयाच्या एसएनसीयू विभागातील डॉ़ डी़ पी़ गाजरे, डॉ़ के. पवार, डॉ़ बागुल, डॉ़ ठाकूर, डॉ़ ठोंबरे, परिचारिका व्ही़ वामोरकर, बी़ पाटील, कटाळे, गावित, नागमोडे, पाटील, शेवाळे, आऱ घुले, कासोटे, घोडेस्वार, शिंदे, शहा यांनी या मरणाच्या दारातील जुळ्या मुलांची ५० दिवस अहोरात्र काळजी घेऊन त्यांना जीवदान दिले़ विशेष म्हणजे मुलांना सोडून गेलेल्या या मातेचा शोध पोलिसांनी आपल्या पातळीवर खूप घेतला मात्र त्यांना अपयश आले़ अखेर पन्नास दिवसांनंतर या मातेचा शोध लावण्यात पोलिसांना यश मिळाले़
पोलिसांनी या मातेला शोधून बुधवारी जिल्हा रुग्णालयात आणले़ या ठिकाणी आपली दोन्ही मुले जिवंत व गुटगुटीत असल्याचे पाहून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला़ मुलांना जीवनदान देणारे जिल्हा रुग्णालयाच्या एसएनसीयू विभागातील डॉक्टर, परिचारिका व पोलिसांचे आभार मानून तिच्या दोन्ही पिलांना कवेत घेऊन ती आपल्या घरी गेली़ या मातेला तिची मुले देताना परिचारिकांनाही भरून
आले होते़