शाहीर शंतनू कांबळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 01:09 AM2018-06-14T01:09:12+5:302018-06-14T01:09:12+5:30

विद्रोही कवी आणि शाहीर शंतनू नाथा कांबळे यांचे बुधवारी (दि. १३) नाशिक येथील खासगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ४० वर्षांचे होते. गुरुवारी (दि. १४) सकाळी ९ वाजता नाशिक अमरधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

 Shahir Shantanu Kamble passes away | शाहीर शंतनू कांबळे यांचे निधन

शाहीर शंतनू कांबळे यांचे निधन

googlenewsNext

नाशिक : विद्रोही कवी आणि शाहीर शंतनू नाथा कांबळे यांचे बुधवारी (दि. १३) नाशिक येथील खासगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ४० वर्षांचे होते. गुरुवारी (दि. १४) सकाळी ९ वाजता नाशिक अमरधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
कांबळे यांच्या पश्चात पत्नी, आई आणि मुलगा असा परिवार आहे. कांबळे गेल्या काही दिवसांपासून पोटाच्या विकाराने त्रस्त होते. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मूळचे सांगली जिल्ह्यातील तासगावचे रहिवासी असलेल्या शंतनू कांबळे यांचे बराच काळ वास्तव्य मुंबईतील वडाळा भागातील कामगार वस्तीतच गेले. गेल्या दहा वर्षांपासून ते नाशिकला स्थायिक झाले होते. शाहीर अण्णा भाऊ साठे, लोकशाहीर वामनदादा कर्डक, शाहीर बोबडे यांच्या प्रभावातून कांबळे यांनी शाहिराच्या माध्यमातून समाजप्रबोधनाची चळवळ पुढे चालविली. सामाजिक विषमता, अंधश्रद्धा याविरोधात त्यांनी गावोगावी जाऊन जनप्रबोधन केले. लोकशाहीचा प्रचार-प्रसार केला. सन २००५ मध्ये त्यांना नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून नागपूर पोलिसांनी अटक केली होती. सुमारे १०० दिवस ते पोलीस कोठडीत होते. मात्र, नंतर त्यांची त्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. कांबळे यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘कोर्ट’ हा चित्रपटही गाजलेला आहे. विद्रोही मासिकाच्या संपादक मंडळावरही त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्या निधनामुळे विद्रोही चळवळीतील एक शिलेदार गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Web Title:  Shahir Shantanu Kamble passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू