मुद्रांक घोटाळ्यातील सातही आरोपी निर्दोष मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 02:47 AM2019-01-01T02:47:35+5:302019-01-01T02:48:08+5:30

देशभरात गाजलेल्या २००३ मधील तेलगी स्टॅम्प घोटाळ्यात रेल्वेच्या बोगीमधून चोरी करण्यात आलेल्या कथित २३ कोटी रुपयांच्या स्टॅम्प चोरी प्रकरणात आरोपी असलेल्या रेल्वे सुरक्षा बलातील सातही अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश पी़ आऱ देशमुख यांनी सोमवारी (दि़ ३१) सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली़

The seven accused in the stamp scam are innocent | मुद्रांक घोटाळ्यातील सातही आरोपी निर्दोष मुक्त

मुद्रांक घोटाळ्यातील सातही आरोपी निर्दोष मुक्त

Next
ठळक मुद्देरेल्वेतून मुद्रांक चोरी प्रकरण : विशेष सीबीआय न्यायालयाचा निकाल

नाशिक : देशभरात गाजलेल्या २००३ मधील तेलगी स्टॅम्प घोटाळ्यात रेल्वेच्या बोगीमधून चोरी करण्यात आलेल्या कथित २३ कोटी रुपयांच्या स्टॅम्प चोरी प्रकरणात आरोपी असलेल्या रेल्वे सुरक्षा बलातील सातही अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश पी़ आऱ देशमुख यांनी सोमवारी (दि़ ३१) सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली़ दरम्यान, या खटल्यातील प्रमुख आरोपी अब्दुल करीम लाडसाब तेलगी याचा २३ आॅक्टोबर २०१७ रोजी तुरुंगात मृत्यू झाला आहे. सरकार पक्षाची बाजू सीबीआयचे वकील ए़ के.मिश्रा यांनी तर आरोपींतर्फे अ‍ॅड़ एस़ बी़ घुमरे, अ‍ॅड. शिवनाथ ढिकले व एम़ वाय़ काळे यांनी काम पाहिले़
नाशिकरोडच्या भारत प्रतिभूती मुद्रणालयात छापले जात असलेले स्टॅम्पपेपर रेल्वे वॅगनद्वारे देशभरात पाठविले जातात़ मात्र, रस्त्यातच रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी व कर्मचारी रेल्वे बोगीचे सील तोडून स्टॅम्पची चोरी करून ते अब्दुल करीम तेलगी यास विक्री करीत असल्याची माहिती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग, दिल्ली (सीबीआय) यांच्या आर्थिक गुन्हे शाखेस मिळाली होती़
नाशिकच्या विशेष न्यायालयात सीबीआयने २००५ मध्ये हजारो पानी दोषारोपपत्र दाखल केले होते तर फेब्रुवारी २०१६ पासून या खटल्यात पुरावे नोंदविण्यास सुरुवात झाली होती़ यामध्ये सीबीआयचे वकील व आरोपीच्या वकिलांनी ४९ साक्षीदार तपासले़ विशेष म्हणजे या खटल्यात साक्षीदारांनी कोणाचीही नावे घेतली नाहीत तर काही साक्षीदारांनी सीबीआयने न सांगता जबाब घेतल्याचे सांगितले़ न्यायाधीश पी़ आऱ देशमुख यांच्या न्यायालयात सीबीआयने दाखल केलेली कागदपत्रे, साक्षीदारांची साक्ष हे आरोपींवरील आरोप सिद्ध करण्यासाठी सबळ नसल्याने सातही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली़ तसेच स्टॅम्प चोरीबाबत कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नसल्याचे वा पंचनामा झाला नसल्याचे आरोपींचे वकील अ‍ॅड़ एस़ बी़ घुमरे, अ‍ॅड. ढिकले व एम़ वाय़ काळे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले़
नाशिक कोर्टात हजर झाला होता तेलगी
अब्दुल करीम तेलगी याच्यावर देशभरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर त्यास काही गुन्ह्णांमध्ये जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली. नाशिकमध्ये तेलगीसह सात आरोपींवर रेल्वे बोगीतून स्टॅम्प पेपरची चोरी केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्णाचे दोषारोपपत्र केंदीय अन्वेषण विभागाने नाशिकच्या विशेष न्यायालयात सादर केले होते़ मात्र, जोपर्यंत तेलगी न्यायालयात हजर होत नाही तोपर्यंत या खटल्याचे काम पुढे सरकणार नसल्याने सीबीआयचे विशेष वकील विश्वास पारख यांनी सांगत त्यासाठी पाठपुरावा केला. त्यातच तेलगीला एड्स झाल्यामुळे न्यायालयीन सुनावणीत गैरहजर राहण्याची अनुमती मिळावी यासाठी त्याच्यावतीने खूप प्रयत्न करण्यात आले. परंतु पारख यांनी चिकाटीने सीबीआयच्या मागे लागून कधी हैदराबाद तर कधी बंगळुरू न्यायालयात पाठपुरावा करून अखेर २०१३ मध्ये तेलगी याच्या नावाने वॉरंट घेतले. अखेर पोलीस बंदोबस्तात तेलगी नाशिकच्या न्यायालयात हजर झाला होता़
विशेष सीबीआय न्यायालयात खटला
१६ डिसेंबर २००३ मध्ये गुन्हा दाखल करून नाशिकच्या विशेष सीबीआय न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता़ यामध्ये तेलगीसह रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी रामभाऊ पुंजाजी पवार (रेल्वे सुरक्षा बलाचे भुसावळ विभागीय अधिकारी), ब्रिजकिशोर तिवारी (निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल), विलासचंद्र राजाराम जोशी (निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल), प्रमोद श्रीराम डहाके (उपनिरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल), मोहम्मद सरवर (शिपाई, रेल्वे सुरक्षा बल), विलास जनार्दन मोरे (शिपाई, रेल्वे सुरक्षा बल), ज्ञानदेव रामू वारके (हवालदार, रेल्वे सुरक्षा बल) यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा तसेच कट रचण्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.

Web Title: The seven accused in the stamp scam are innocent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.