ठळक मुद्देचौपदरीकरणाचे काम पूर्ण झालेले नाहीवाहनधारकांना टोलमाफी देण्यात यावीशिवसेनेच्या वतीने मोर्चा

नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदेगाव येथील टोलनाक्यावर २० किलोमीटरच्या अंतरामधील वाहनधारकांना टोल माफी देण्यात यावी, टोलनाक्यावर स्थानिक युवक-युवतींना नोकरीत प्राधान्य देण्यात यावे या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी सकाळी जोरदार आंदोलन करण्यात आले.
नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदेगाव येथील टोलनाका गुरुवारी मध्यरात्रीपासून नाशिक-सिन्नर टोलवेज लि. कंपनीकडून सुरू करण्यात आला. शिंदेगाव टोलनाक्यापासून सिन्नर फाट्यापर्यंत महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही. चेहेडी दारणा नदीवरील नवीन पूल, शिंदेगाव येथील पूल, बोगदा व सर्व्हिस रोडचे काम पूर्ण झालेले नसताना टोलनाका सुरू करण्यात आल्याचा शिवसेनेचा आरोप आहे.
टोलनाक्यावर २० किलोमीटर अंतरामधील ग्रामस्थ, वाहनधारकांना टोलमाफी देण्यात यावी, टोलनाक्यावर स्थानिकांना नोकरीमध्ये प्राधान्य द्यावे या मागणीसाठी शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता शिंदेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. येत्या ३० डिसेंबरपर्यंत महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले नाहीतर पुन्हा शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. नाशिक-सिन्नर टोलवेज लि. कंपनीचे प्रकल्प संचालक सुनील भोसले यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. आंदोलनामध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख जगन आगळे, तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के, नगरसेवक केशव पोरजे, अनिल ढेरिंगे, संजय तुंगार, सुधाकर जाधव, नितीन खर्जुल, उज्ज्वला जाधव, वंदना जाधव, शिवाजी भोर, राहुल ताजनपुरे, राजू साबळे, सुदाम ढेमसे, योगेश म्हस्के, सचिन जगताप, अशोक बोराडे, बाजीराव जाधव आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.