लोेकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महाराष्ट्र विधान मंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीचा नाशिला २८ जून ते १ जुलै दरम्यान येत आहे. मागील वेळी पुरेशी माहिती नसल्याने या समितीने दौरा अर्धवट सोडला होता.
आमदार रूपेश म्हात्रे या अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष आहेत. २८ जून रोजी ही समिती सकाळी आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांसह लोकप्रतिनिधींशी चर्चा करतील. त्यानंतर पोलीस विभागाच्या शहर व ग्रामीण पोलिसांचा आढावा, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, राज्य परिवहन महामंडळ विभाग, उत्पादन शुल्क, आदिवासी विकास विभागाचा आढावा घेण्यात येईल. दुपारी महापालिका व सायंकाळी जिल्हा परिषदेत जाऊन ही समिती आढावा घेईल. २९ जून रोजी आरोग्य विज्ञान विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठला भेट देऊन आढावा, ३० जूनला दिवसभर जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा, वसतिगृह यांना भेटी देऊन तपासणी तसेच १ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आढावा बैठक असा या अनुसूचित जमाती कल्याण समितीचा दौरा आहे. सर्वच शासकीय विभागांची आता माहिती गोळा करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.