संत तुकाराम वनग्राम योजना : वनसंवर्धनात नाशिकचा गवळीपाडा ठरला उत्कृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 08:04 PM2019-07-16T20:04:13+5:302019-07-16T20:06:00+5:30

जिल्ह्यातील वनक्षेत्रालगत असलेल्या गावांमध्ये वनविभागाने संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांची स्थापना करून वनसंवर्धनासाठी स्थानिक आदिवासी नागरिकांचे प्रबोधन करत लोकसहभाग मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

Sant Tukaram Vanagram Scheme: Nashik's Gavalipada was considered as one of the best in forestry | संत तुकाराम वनग्राम योजना : वनसंवर्धनात नाशिकचा गवळीपाडा ठरला उत्कृष्ट

संत तुकाराम वनग्राम योजना : वनसंवर्धनात नाशिकचा गवळीपाडा ठरला उत्कृष्ट

googlenewsNext
ठळक मुद्देचराईबंदी, कु-हाडबंदी करून वनसंवर्धनासाठी प्रयत्नजल व मृद संधारणाची कामेही करण्यावर भर

नाशिक : वनसंरक्षण, संवर्धन आणि विकासासाठी पुरक अशी कामे करून वन्यजीवांना नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून देत जैवविविधतेची जोपासणा करण्यामध्ये जिल्ह्यातील वनविभाग पुर्व, पश्चिम भागातील तीन गावांनी यश मिळविले आहे. संत तुक ाराम वनग्राम योजनेअंतर्गत गवळीपाडा, गौंदुने, श्रीघाट या गावांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळविल्याची माहिती जिल्हास्तरीय निवड समितीचे सदस्य सचिव तथा उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी दिली.
जिल्ह्यातील वनक्षेत्रालगत असलेल्या गावांमध्ये वनविभागाने संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांची स्थापना करून वनसंवर्धनासाठी स्थानिक आदिवासी नागरिकांचे प्रबोधन करत लोकसहभाग मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. लोकसहभागातून वनविकास साधताना वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वन-वन्यजीव संवर्धनाकरिता पुरक ठरणारे उपक्रम राबवून २०१७-१८ या वर्षासाठी तीन गावे संत तुकाराम वनग्राम योजनेत विजयी ठरली. येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यासाठी परिश्रम घेऊन सातत्याने गावक-यांच्या मदतीने वनसंवर्धनासाठी विविध उपक्रम राबविले.
वनविभाग पुर्वमधील दिंडोरी तालुक्यातील मौजे गवळीपाडा (महाजे) येथील वनव्यवस्थापन समितीने २०११-१२सालापासून ३६७ हेक्टर क्षेत्रावर चराईबंदी, कु-हाडबंदी करून वनसंवर्धनासाठी प्रयत्न केले. वनविभागाकडून सोपविण्यात आलेल्या या क्षेत्राची उत्कृष्ट पध्दतीने देखभाल करत क्षेत्रावरील वनविकास व संवर्धन करण्यावर भर दिला. त्यामुळे येथील विविध वृक्षप्रजातीची जोपासना होण्यास मदत झाली. याबरोबरच या समितीने २०१४-१५साली वनविकास यंत्रणा योजनेअंतर्गत ७५हेक्टर क्षेत्रावर रोपवन घेतले. शासनाच्या महत्त्वाकांक्षी ५०कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत २०हेक्टर क्षेत्रावर रोपवन घेण्यात आले. तसेच जल व मृद संधारणाची कामेही करण्यावर भर दिला. जुन्या साग रोपवनाचेही संवर्धन यशस्वीपणे केले. त्यामुळे गवळीपाडा जिल्हास्तरावर संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराचे मानकरी ठरले. या समितीला ५१ हजार रूपयांचे बक्षीस तर सुरगाणा तालुक्यातील गोंदुने आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्रीघाट आदिवासी पाड्यांच्या समित्यांना अनुक्रमे ३१ हजार (द्वितीय), ११ हजाराचे (तृतीय) बक्षीस वनविभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.

बुधवारी बक्षीस वितरण
संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत विजयी झालेल्या गावातील समित्यांच्या पदाधिका-यांना जिल्हास्तरीय निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या हस्ते जाहीर समारंभात बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे. उंटवाडी येथील वनविश्रामगृह येथे बक्षीस वितरणाचा सोहळा बुधवारी (दि.१७) सकाळी ११ वाजता पार पडणार असल्याची माहिती वनविभागाच्या सुत्रांनी दिली.

Web Title: Sant Tukaram Vanagram Scheme: Nashik's Gavalipada was considered as one of the best in forestry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.