सह्याद्री नवल : पर्यटक अनुभवत आहेत ‘सांदण’ सर करण्याचा थरार...

By अझहर शेख | Published: January 5, 2019 01:58 PM2019-01-05T13:58:25+5:302019-01-05T14:00:46+5:30

सांदण दरीची लांबी सुमारे चार किलोमीटर आणि खोली दोनशे ते चारशे फूट इतकी आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील हे एक अद्भूत नैसर्गिक नवलचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Sahyadri Naval: Tourists are experiencing 'sandan'vally crossing ... | सह्याद्री नवल : पर्यटक अनुभवत आहेत ‘सांदण’ सर करण्याचा थरार...

सह्याद्री नवल : पर्यटक अनुभवत आहेत ‘सांदण’ सर करण्याचा थरार...

Next
ठळक मुद्देसांदण दरीची लांबी सुमारे चार किलोमीटर भौगोलिक प्रस्तरभंग रेषा अर्थात जमीनीला पडलेली मोठी भेग पर्यटकांनी कुठल्याही पध्दतीने निसर्गाला हानी पोहचवू नये

नाशिक : आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या ‘सांदण’ सर करण्याचा थरार अनुभवण्यासाठी गिरीभ्रमंती करणाºया गिर्यारोहकांसह पर्यटकांमध्ये चढाओढ दिसून येत आहे. ‘सांदण’ दरी ही अकोले तालुक्यातील साम्रद गावात आहेत. हिवाळा असल्यामुळे सांदण सर करण्यास फारसा अडथळा येत नसल्याने मोठ्या संख्येने नागरिक या दरीला भेट देत दरीमधून चालण्याचा थरार अनुभवत आहेत. भंडारद-यापासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर सांदण दरी आहे. भंडारदरा धरणाच्या स्पीलवेलवरुन पुढे आल्यानंतर रतनवाडी फाट्यावरून कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या वाटेवरुन रतनवाडीमार्गे साम्रद गावाच्या शिवारात सांदण दरी गाठता येते.

सांदण दरीची लांबी सुमारे चार किलोमीटर आणि खोली दोनशे ते चारशे फूट इतकी आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील हे एक अद्भूत नैसर्गिक नवलचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एका अतिप्राचीन भौगोलिक प्रस्तरभंग रेषा अर्थात जमीनीला पडलेली मोठी भेग यामुळे ही दरी किंवा घळ निर्माण झाल्याचे बोलले जाते. सांदणचा परिसर अत्यंत निसर्गरम्य असून वृक्षराजीने नटलेला आहे. यामुळे सांदण दरी नेहमीच पर्यटकांच्या पसंतीस खरी उतरली आहे. सांदण दरी पावसाळ्यात बघणे अशक्य होते. प्रचंड धुके व दरीकडे जाणाºया वाटेत चिखलाचे साम्राज्य असते. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तवर सांदणचा मार्ग बंद केला जातो. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात सांदण दरीचा थरार अनुभवणे शक्य होते. यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने सांदणदरीमध्ये उतरू लागले आहेत. या दरीला भेट देताना निसर्गामध्ये कुठल्याहीप्रकारचा हस्तक्षेप पर्यटकांनी टाळावा तसेच परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा, इतकीच माफक अपेक्षा गावकºयांकडून व्यक्त केली जात आहे. संपूर्ण दरी पार केल्यानंतर समोर विराट कोकणकडा जणू सांदणप्रेमींचे स्वागतच करतो. त्याचे विराट सौंदर्यशाली रूपडे बघून मनाला मोहिनी न पडल्यास नवलचं. भंडारदरा टुरिझम संस्थेच्या वतीने पर्यटकांना भंडारदरा परिसरातील निसर्गसौंदर्य तसेच विविध पर्यटनकेंद्रांची माहिती तसेच मार्गदर्शन केले जात आहे. पर्यटकांनी भंडारदरा परिसरात निसर्गाच्या सानिध्यात फिरताना कुठल्याहीप्रकारे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावी, धोकादायक ठिकाणी जाण्याचा किंवा सेल्फी टिपण्याचा मोह करु नये, तसेच जंगलाच्या परिसरात विनाकारण पाऊलवाटा सोडून भटकंती करु नये, स्थानिक वाटाड्या तसेच संस्थेच्या मार्गदर्शक नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन रवी ठोंबाडे यांनी केले आहे. त्याचप्रमाणे नाशिक वन्यजीव विभागाच्या अखत्यारितीत हा सगळा परिसर येत असल्यामुळे वन-वन्यजीव विभागाच्या सर्व नियम या परिसराला लागू आहे. या भागात जाळपोळ करणे, मद्यप्राशन करुन धिंगाणा घालणे, जैवविविधतेला त्रास होईल, असे कृत्य करणे भारतीय वन संवर्धन व वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत अपराध ठरतो. त्यामुळे पर्यटकांनी कुठल्याही पध्दतीने निसर्गाला हानी पोहचवू नये, असे आवाहन नाशिक वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी केले आहे. निसर्गाला हानी पोहचवताना आढळून आल्यास संबंधितांवर कठोर वनविभागाच्या कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या भागात भंडारदरा वनपरिक्षेत्राच्या वन अधिकारी-कर्मचा-यांचे पथक नियमीत स्वरुपात गस्तीवर असल्याचे ते म्हणाले.
 

Web Title: Sahyadri Naval: Tourists are experiencing 'sandan'vally crossing ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.