जंगली झुडुपांची पडणार भर : ‘वनराई’त नाशिककर साजरा करणार वृक्षांचा ‘बर्थ-डे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 01:48 PM2019-06-01T13:48:54+5:302019-06-01T13:58:28+5:30

येत्या बुधवारी (दि.५) संस्थेकडून ‘नाशिक वनराई’मध्ये शेकडो वृक्षांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. याबरोबरच येथे ६०० जंगली झुडुपांची लागवडदेखील केली जाणार आहे.

Rare forestry Shrub : 'Birth-day' of trees in Nashik | जंगली झुडुपांची पडणार भर : ‘वनराई’त नाशिककर साजरा करणार वृक्षांचा ‘बर्थ-डे’

जंगली झुडुपांची पडणार भर : ‘वनराई’त नाशिककर साजरा करणार वृक्षांचा ‘बर्थ-डे’

Next
ठळक मुद्देझाडांना ‘गिफ्ट’ देण्याचे आवाहनसंवर्धनासाठी जिद्दीने उपाययोजना करण्यावर ‘फोकस’

नाशिक : ‘जागतिक पर्यावरण दिन’ अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. यासाठी शहरातील विविध पर्यावरणप्रेमी संस्थांनी वेगवेगळे उपक्रमांचे नियोजन केले आहेत. त्यापैकी एक आपलं पर्यावरण संस्था. ही संस्था मागील पंधरा वर्षांपासून शहर व परिसरात वृक्ष लागवड व संवर्धनाचे काम करत आहेत. या संस्थेने गेल्या चार ते पाच वर्षांपासून शहरात दरवर्षी पर्यावरण दिनाच्या औचित्य साधत आगळा वेगळा ‘वनमहोत्सव’ साजरा करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यामुळे नाशिककरांमध्ये वृक्ष लागवड, संवर्धनाविषयीची जनजागृती तर होतच आहे; मात्र पर्यावरण संवर्धनाची आवडही निर्माण होत आहे. येत्या बुधवारी (दि.५) संस्थेकडून ‘नाशिक वनराई’मध्ये शेकडो वृक्षांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. याबरोबरच येथे ६०० जंगली झुडुपांची लागवडदेखील केली जाणार आहे. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमासाठी नाशिककर पुन्हा सज्ज झाले आहेत.

आपलं पर्यावरण संस्थेने शहरात २०१५ साली सातपूर येथील वनविभागाच्या जागेत नाशिक पश्चिम वनविभागाच्या परवानगीने व पुढाकाराने ‘नाशिक देवराई’ संकल्पना राबविण्याचे ठरविले. येथील सुबाभूळ, ग्लिरिसिडीयाचे मृत जंगल जीवंत करण्याचे मोठे आव्हान या संस्थेने स्विकारले. फाशीचा डोंगर या नावाने ओळखली जाणारी ही जागा आता ‘नाशिक देवराई’ म्हणून नावारूपाला आली आहे. येथे अकरा हजार भारतीय प्रजातीची रोपांची दमदार वाढ झाली असून गेल्या वर्षीय दुर्मीळ रानवेलींची लागवड या ठिकाणी करण्यात आली होती. याच धर्तीवर म्हसरूळ येथील वनविभागाच्या जागेत संस्थेने सहा हजार झाडांची लागवड २०१६ साली करून वनमहोत्सव साजरा केला. या ठिकाणी ‘नाशिक वनराई’ विकसीत करण्याचा संस्थेचा हा प्रयत्न आहे. यंदा वनराईमध्ये भर टाकली जाणार आहे, ती म्हणजे दुर्मीळ अशा २५ ते ३० प्रजातीच्या जंगली झुडुपांची. या प्रजातींची सुमारे सहाशेहून अधिक रोपांची लागवड पर्यावरणदिनाच्या औचित्यावर केली जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शेखर गायकवाड यांनी दिली. संस्थेचे हे दोन्ही प्रकल्प यशस्वी झाले असून वैयक्तिक गायकवाड हे याबाबत लक्ष देऊन आपल्या हरित सैनिकांच्या मदतीने त्यासाठी प्रयत्नशील आहेत. वृक्ष संवर्धन करताना बदलत्या ऋुतुचक्रानुसार येणाऱ्या विविध अडचणी नवनवीन आव्हानांचा सामना करत त्यांची टीम संयम बाळगून रोपांच्या संवर्धनासाठी जिद्दीने उपाययोजना करण्यावर ‘फोकस’ करत आहेत.
केवळ वृक्षारोपण करून लावलेली वृक्ष वा-यावर सोडून देणे हा या संस्थेचा मुळीच उद्देश नाही, तर लावलेली रोपे जगणार कशी आणि त्यांचे वृक्षांमध्ये रूपांतर कसे होईल, यादृष्टीने संस्थेचे सर्व स्वयंसेवक प्रयत्नशील आहेत. भारतीय प्रजातीच्या रोपांची लागवडीमागे जैवविविधतेची जोपासना हा मुख्य उद्देश आहे. विविध प्रकारच्या किटकांपासून पक्ष्यांपर्यंत आणि प्राण्यांपर्यंत जैवविविधता जोपासली जावी, या दृष्टीने रोपांची लागवड आणि संगोपनावर संस्थेकडून भर दिला जात आहे. भविष्यात हे दोन्ही प्रकल्प निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमींकरिता अभ्यासाचे सुसज्ज असे केंद्र व्हावे, असा मानस गायकवाड यांनी बोलून दाखविला.
झाडांना ‘गिफ्ट’ देण्याचे आवाहन
येत्या बुधवारी साजरा होणाºया वनमहोत्सवांतर्गत नाशिककरांनी वनराईवर हजेरी लावताना आपल्या लाडक्या झाडांना न विसरता त्यांच्या गरजेचे ‘गिफ्ट’ आणण्याचे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे. ‘गिफ्ट’ची कल्पनाही अत्यंत भन्नाट आहे, ती म्हणजे येताना पाच लिटर पाण्याचे कॅन अन् शक्य झाल्यास गांडुळ किंवा कंपोस्ट खताची लहानशी बॅग.

Web Title: Rare forestry Shrub : 'Birth-day' of trees in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.