ठळक मुद्दे नोकरी मिळाल्यास कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे सुलभ होईल,...अन्यथा वीर जवानांचे बलिदान व्यर्थ जाईल

नाशिक : जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडी येथील रहिवासी असलेल्या गोसावी कुटुंबाचा एकुलता एक मुलगा लान्सनायक केशव सोमगीर गोसावी याने देशासाठी हौतात्म्य पत्कारले. त्यांचे स्मारक लवकरात लवकर उभारावे, अशी मागणी वीरपत्नी यशोदा गोसावी यांनी केली आहे.

नव्या वर्षाची नवी सुरूवात म्हणून शहरातील गंगापूररोड येथे राहणाऱ्या वीरपत्नी रेखा खैरनार यांच्या घरी जिल्ह्यातील सर्व वीरपत्नींसह माजी सैनिकांच्या पत्नींचा घरगुती मेळावा शनिवारी (दि.५) झाला. यावेळी गोसावी उपस्थित होत्या.

">

त्या म्हणाल्या, माझे पती शहीद केशव हे आमच्या कुटुंबाचे आधारवड होते. त्यांच्या बलिदानाचा आम्हा सगळ्यांना अभिमान आहे. त्यांचे बलिदान हे सरकार व्यर्थ जाऊ देणार नाही, तसेच आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी या देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सगळ्यांच्या बलिदानाच्या बदल्यात भारतीय सेना पाकिस्तान व जम्मु-काश्मिरमध्ये घुसखोरी करणा-या आतंकवाद्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. गरज आहे ती सरकारने सेनेचे हात बळकट करण्याची.
शहीद केशव यांच्या पार्थिवावर गावात जेथे अंत्यसंस्कार करण्यात आले, तेथे लवकरात लवकर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्मारक उभारावे आणि येत्या स्वातंत्र्यदिनाला त्यांच्या स्मारकावर तिरंगा अभिमानाने फडकवावा, अशी मागणी वीरपत्नी यशोदा गोसावी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी स्मारकासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र त्यादृष्टीने अद्याप कुठलीही हालचाल होताना दिसत नाही. तेरा दिवसांमध्ये अर्थसहाय्य केले जाईल तसेच शेतजमीन वारस म्हणून देण्याचे आश्वासन राज्य सरकारमार्फत पालकमंत्र्यांनी केले होते; मात्र यापैकी एकही आश्वासन अद्याप पुर्ण झालेले नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली. तसेच शासकिय कार्यालयात लिपिक म्हणून मला नोकरी मिळाल्यास कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अधिक सुलभ होईल, त्यामुळे सरकारने माझ्या नोकरीचा विचार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सैनिक देशाच्या रक्षणासाठी सीमेवर उभा असतो; मात्र सैन्यदलातील जवानांच्या संरक्षणासाठीदेखील भारतीय सेनेला अत्यावश्यक सोयीसुविधा व अत्याधुनिक यंत्रसामुग्री पुरविणे गरजेचे आहे. सरकारने भारतीय सेनेचा विश्वास वेळोवेळी उंचावून जवानांची ताकद वाढवावी, अन्यथा वीर जवानांचे बलिदान व्यर्थ जाईल, असेही वीरपत्नी यशोदा यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या होत्या.


Web Title: Raise memorial of martyr Keshav Gosavi as soon as possible: Veerappani Yashoda
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.