नाशिक : मंगळवारी पावसाने पूर्व भागातील तालुक्यांमध्ये जोरदार हजेरी लावल्याने शेतकरीवर्गात समाधान व्यक्त केले जात असून, कापणीला आलेल्या पिकांना या पाण्यामुळे मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यात १०६ टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. येत्या ४८ तासांत अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून हवामानात प्रचंड बदल झाला असून, हवेतील उकाडा वाढला आहे. आकाशात ढगांनी गर्दी केल्याने अधून मधून पावसाची हजेरी लागत आहे. सोमवारी रात्री व मंगळवारी रात्री सलग दोन दिवस विजेच्या कडकडाटात जोरदार पाऊस कोसळल्याने त्याचा शेतकºयांना फायदा झाला आहे. मका, बाजरी, सोयाबीन, भुईमूग या पिकांना हा पाऊस उपयोगी असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. मंगळवारी रात्री जिल्ह्यातील पूर्व भागातील मालेगाव, चांदवड, नांदगाव, देवळा, कळवण, बागलाण, सिन्नर, येवला या तालुक्यात जोरदार पाऊस झाला. उलट पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाºया पश्चिम भागात पावसाने पाठ फिरविली आहे. सप्टेंबर महिन्याच्या सरासरीनुसार गेल्या दहा दिवसांत २२ टक्के पाऊस झाला असून, वार्षिक सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात १०६ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यापर्यंत ९० टक्के पाऊस झाला होता. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत पावसाने शंभरी ओलांडली असून, मालेगाव, चांदवड, कळवण, बागलाण, देवळा, सिन्नर, येवला या तालुक्यांमध्ये मात्र अद्याप शंभरी गाठायची आहे.