‘आर-पार’साठीची अगतिकता!

By किरण अग्रवाल | Published: August 19, 2018 01:21 AM2018-08-19T01:21:33+5:302018-08-19T01:22:21+5:30

गल्ली ते दिल्ली सत्तेत असलेल्या भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांना आगामी निवडणुकीतील पक्ष-कार्यासाठी कार्यकर्ते उपलब्ध होत नसतील तर ते ‘हायर’ करा, असे सांगण्याची वेळ यावी, यातच त्यांची अगतिकता सामावली आहे. पक्ष सत्तेत गेला; पण कार्यकर्ते जोडले गेले नाहीत. जे आहेत त्यांना कसली संधीही दिली गेली नाही, म्हणून आज कार्यकर्ते शोधण्याचा व निधी खर्चून ते मिळवण्याचा आटापिटा करावा लागत आहे. भाजपातील वाढत्या व्यावसायीकरणाचीच ही झलक म्हणता यावी. विरोधकांची शक्ती एकवटत असल्याच्या पार्श्वभूमीवरील ही खटपट म्हणजे ‘आर-पार’च्या लढाईचाच संकेत ठरावी.

'R-par' for the vulnerability! | ‘आर-पार’साठीची अगतिकता!

‘आर-पार’साठीची अगतिकता!

Next

गल्ली ते दिल्ली सत्तेत असलेल्या भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांना आगामी निवडणुकीतील पक्ष-कार्यासाठी कार्यकर्ते उपलब्ध होत नसतील तर ते ‘हायर’ करा, असे सांगण्याची वेळ यावी, यातच त्यांची अगतिकता सामावली आहे. पक्ष सत्तेत गेला; पण कार्यकर्ते जोडले गेले नाहीत. जे आहेत त्यांना कसली संधीही दिली गेली नाही, म्हणून आज कार्यकर्ते शोधण्याचा व निधी खर्चून ते मिळवण्याचा आटापिटा करावा लागत आहे. भाजपातील वाढत्या व्यावसायीकरणाचीच ही झलक म्हणता यावी. विरोधकांची शक्ती एकवटत असल्याच्या पार्श्वभूमीवरील ही खटपट म्हणजे ‘आर-पार’च्या लढाईचाच संकेत ठरावी.
कार्यकर्ता हा कोणत्याही पक्ष-संघटनेचा आत्मा असतो. त्याच्या बळावर व समर्पणावरच तर पक्षांच्या यशाचे इमले उभे राहात असतात. त्यामुळेच त्याची घडवणूक, जपणूक व सन्मान या बाबींवर आजपर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी भर दिल्याचे दिसून येते. विशेषत: निवडणुकीच्या रणसंग्रमात निष्ठेने भारलेली प्रामाणिक कार्यकर्त्यांची फळीच पक्षाच्या उमेदवाराला विजयाच्या चौकटीवर नेऊन उभी करत असते; पण ‘इलेक्टिव्ह मेरिट’च्या निकषाने बलदंडांची सर्वत्र चलती होऊ लागल्याने अलीकडे कार्यकर्त्यांमधून नेते घडण्याची प्रक्रिया संथ झाली. रेडिमेड नेत्यांची व उमेदवारांची उधार-उसनवारी वाढली. परिणामी कार्यकर्त्यांची चणचण जाणवू लागली. अर्थात, अशाही स्थितीत कार्यकर्त्याला महत्त्व देत वाटचाल करणारे पक्ष अजूनही आहेत, कारण त्यांच्या लेखी कार्यकर्तेपणाला किंमत आहे. मात्र दुसरीकडे प्रसंगी ‘किंमत’ मोजून कार्यकर्ते मिळवण्याची भाषा उघडपणे केली जात असल्याने अशांना कार्यकर्ते हवेत, की कामगार, असाच प्रश्न पडावा. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाशकातील बंदद्वार बैठकीत केलेल्या ‘निधीची चिंता करू नका, कार्यकर्ते हायर करा’ या सूचनेकडेही त्याचसंदर्भाने बघता यावे.
सारेच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्र होतील की मागे-पुढे, याचा फैसला अजून व्हायचा आहे; परंतु नगारे वाजत आहेत. यात सारेच पक्ष सक्रिय झाले असले तरी, भाजपा जरा जास्तच आघाडीवर आहे. कारण, सर्व विरोधकांची महाआघाडी दृष्टिपथात असल्याने ते काहीशा भीतीच्या सावटात आहेत. ‘वन नेशन, वन इलेक्शन’चा भाजपाचा प्रयत्न त्या भीतीतूनच केला जात असल्याचा आरोप त्यामुळेच नाशिक दौऱ्यावर येऊन गेलेले काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. खुद्द भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाशकात घेतलेल्या पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना येऊ घातलेल्या निवडणुकीला ‘आर-पारची लढाई’ संबोधले, यावरूनही या पक्षाने विरोधकांच्या एकजुटीला किती गांभीर्याने घेतले आहे त्याची प्रचिती यावी. अर्थात, मुद्दा तो नाहीच. निवडणुका या गांभीर्यानेच घ्यायच्या असतात, सहजगत्या मैदान मारून नेण्यासारख्या स्थितीत आता कुणीच किंवा कोणताच पक्ष नाही, त्यामुळे ‘आर-पार’ची भाषा योग्यच म्हणावी; परंतु तशी लढाई लढताना कार्यकर्ते ‘घडविण्या’ऐवजी ‘मिळवण्या’च्या संदर्भाने निधी खर्चून कार्यकर्ते ‘हायर’ करण्याचा दानवे यांनी जो सल्ला दिला आहे तो, अधिक महत्त्वाचा आहे. कारण संपूर्ण देश पादाक्रांत करायला निघालेल्या त्यांच्या पक्षाला अजूनही पक्षकार्यासाठी कार्यकर्ते मिळत नसल्याची वास्तविकता तर त्यातून उजागर होणारी आहेच, शिवाय राजकारणातील व्यावसायिकीकरणाची चुणूकही त्यातून स्पष्ट होणारी आहे. नीती-तत्त्वाच्या, राजकीय स्वच्छतेच्या व इतरांपेक्षा वेगळेपणाच्या भाजपाच्या गप्पा किती फोल आहेत, तेच यातून उघड व्हावे!
भाजपा आज देशात केंद्रस्थानी असून, महाराष्ट्रासह २० राज्यांतही या पक्षाची सत्ता आहे. इतकेच काय, जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणूनही त्याचे नेते आपली गणना करून घेत असतात. इतके सारे असताना या पक्षाला प्रसंगी भाडोत्री कार्यकर्ते ‘हायर’ करण्याची वेळ का यावी, हा यातील खरा सवाल आहे. भाजपा निधीचा यथेच्छ वापर करून, म्हणजे पैशाच्या बळावर निवडणुका जिंकावयास निघाल्याचा जो आरोप विरोधकांकडून केला जात आहे त्याला यासंदर्भाने दुजोराच मिळून गेल्याचे म्हणता यावे. कारण, आज भाजपाच काय, कोणत्याही पक्षाकडे ‘घरचे खाऊन’ किंवा पदरमोड करून पक्षकार्य करणारे अथवा प्रचारात जीव ओतणारे कार्यकर्ते राहिलेले नाहीत ही वास्तविकता आहे. काही अपवाद आहेतही; परंतु त्याने खर्च टळत नाही. पक्ष अशा प्रामाणिक अगर निष्ठावंतांची योग्य ती दखल घेत नाही किंवा त्यांना कसली संधी देत नाही म्हणून ही चणचण ओढवली आहे हेदेखील खरे, मात्र आहे त्या कार्यकर्त्यांना म्हणजे पक्ष विस्तारकांना सुविधा म्हणून मोटारसायकल विकत घेऊन देणे वेगळे आणि पक्षीय विचारांशी बांधील नसलेल्यांना निवडणूक कार्यासाठी कार्यकर्ता म्हणून ‘हायर’ करणे वेगळे. निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा ते करू पाहात आहे. ‘प्रोफेशनॅलिझम’चा हा प्रवास गरजेचा म्हणता म्हणता अगतिकता दर्शवून देणाराही आहे.
अगतिकताही का ओढवावी, तर कार्यकर्ते न जपले गेल्यामुळे. नाशकातलेच उदाहरण घेऊ या. महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपाचे ६६ पैकी अवघे उणे-पुरे एक डझनच नगरसेवक मूळ पक्ष कार्यकर्ते आहेत. सुमारे ८० टक्के नगरसेवक असे आहेत जे दुसºया पक्षातून येऊन उमेदवार बनले व सत्तेत पोहोचले. सत्तेसाठी काही तडजोडी कराव्या लागतातच; परंतु किती प्रमाणात? सत्तेची झुळूक नसताना खस्ता खाल्लेल्या कार्यकर्त्यांना पक्षाने ‘अच्छे दिन’ आले असताना संधी दिली नाही म्हणून आज दानवेंना कार्यकर्ते ‘हायर’ करण्याची वेळ आली. बरे, इतक्यावर थांबले गेले नाही. उपमहापौर, सभागृह नेता व सत्ताकाळातले स्थायी समितीचे पहिले सभापतिपदही बाहेरच्यांना दिले गेले. पक्षातल्या महत्त्वाच्या पदांवरही परपक्षातून आलेल्यांना स्थानापन्न केले गेले. सत्तेच्या माध्यमातून देता येऊ शकणारी संधी अधिकतर इतरांनीच लाटली म्हटल्यावर कार्यकर्त्यांच्या वाट्याला काय आले? साधे विशेष कार्यकारी अधिकारी नेमायला उशीर लावला गेला. सत्ता संपायला आली तरी शासकीय समित्यांवरील नियुक्त्याही बाकीच आहेत. त्यामुळेच ‘बूथ’वर काम करण्यास कुणी पुढे येत नाही असे बैठकीतच सांगितले गेले. मग कार्यकर्ता घडेल कसा? दुसरे म्हणजे, नेते व कार्यकर्त्यांमधील संवादच संपत चालला आहे. पक्ष कार्यालय ‘वसंत स्मृती’मध्येच वेगवेगळ्या खोल्या व कक्षात संपर्कासाठी ‘इंटरकॉम’ बसविले गेले, त्यामुळे प्रत्यक्ष भेटी व बोलण्यात दुरावा आल्याचे पक्ष कार्यकर्तेच सांगतात. नेते जमिनीवर यायला तयार नाही. दानवे यांच्या बैठकीतच जिल्हा परिषदेच्या एका महिला सदस्याला सुनावताना वारसा हक्क डोक्यातून काढून टाकून ‘लो प्रोफाईल’ होण्याचे सांगावे लागले. एका पंचवार्षिकमध्येच अशी हवा डोक्यात जाणार असेल तर कार्यकर्ते बाहेरूनच आणावे लागणार! तेव्हा, विरोधकांच्या एकीच्या भीतीतून आकारास आलेली भाजपातील अस्वस्थता व अगतिकता बरेच काही सांगून जाणारी ठरावी.

Web Title: 'R-par' for the vulnerability!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.