त्र्यंबकराजाच्या मंदिरात असुविधांची रांग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 03:49 PM2019-06-26T15:49:01+5:302019-06-26T15:49:07+5:30

भाविकांची गैरसोय : भारतीय पुरातत्व खात्याचा आडमुठेपणा

A queue of inconvenience in the temple of Trimbakraj | त्र्यंबकराजाच्या मंदिरात असुविधांची रांग

त्र्यंबकराजाच्या मंदिरात असुविधांची रांग

googlenewsNext
ठळक मुद्देदेवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांना एक वर्ष पुर्ण होत आहे. परंतु विकासाचा विषय आल्यावर पुरातत्व विभागाची अडचण दाखिवली जात आहे.

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांना सुलभतेने दर्शन व्हावे, ऊन,पाऊस, थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी भारतीय पुरातत्त्व विभाग देवस्थानाच्या न्यासाला परवानगी देत नसल्याने त्र्यंबकराजाच्या मंदिरात असुविधांची रांगच लागली आहे. दर्शनबारीत भाविकांना पुरेशा सोयी-सुविधा नसल्याने अनेकांच्या प्रकृतित बिघाड होण्याचे प्रकार घडले आहेत. पुरातत्व खात्याने आडमुठेपणाची भूमिका सोडून देत भाविकांना आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविण्यासाठी न्यासाला परवानगी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्र्यंबकेश्वर येथील मंदीर अति प्राचीन असल्याने त्यावर पुरातत्व खात्याचे नियंत्रण आहे. मंदिरातील आतील व बाहेरील दगडी बांधकामाला छेडायचे नाही, कुठलेही खोदकाम करायचे नाही. मंदीर व त्यापासुन २०० मीटर परिसरात कोणतेही बांधकाम अगर दुरु स्ती करायची नाही, असा दंडक पुरातत्व विभागाने घालून दिलेला आहे. त्यामुळे भाविकांना सोयी पुरविण्यात न्यासाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मंदिरात भाविकांसाठी शिर्डी-पंढरपूर आदी देवस्थानांप्रमाणे सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत. दर्शन रांगेत वयोवृद्ध भाविकांना बसण्यासाठी बाकांची सोय नाही. भाविकांची प्रकृती बिघडल्यास न्यासाचा दवाखाना नाही तसेच भोजनगृहाचीही सुविधा नाही. न्यासाकडून देणगी पावती तसेच व्हीआयपी दर्शनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी जमा होतो. त्या निधीतूनही सोयीसुविधा पुरविल्या जात नाहीत.
भाविकांना अस्वस्थ वाटण्याचे प्रकार
दोन दिवसांपूर्वीच नाशिकच्या एका भाविकाला दर्शन रांगेत अस्वस्थ वाटू लागल्याने त्याने स्वत: रांगेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रवेशद्वाराजवळच तो कोसळला. दवाखान्यात त्याला भरती केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रांगेत भाविकांना अस्वस्थ वाटण्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत. तरीही न्यासाकडून सोयीसुविधांबाबत लक्ष दिले जात नाही. देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांना एक वर्ष पुर्ण होत आहे. परंतु विकासाचा विषय आल्यावर पुरातत्व विभागाची अडचण दाखिवली जात आहे.

Web Title: A queue of inconvenience in the temple of Trimbakraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.