प्रज्ञासिंहच्या उमेदवारीचे पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:58 AM2019-04-19T00:58:31+5:302019-04-19T00:59:22+5:30

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह यांना भाजपतर्फे भोपाळमधून उमेदवारी देण्यात आल्याने त्याचे पडसाद मालेगाव शहरात उमटले. भाजपच्या या निर्णयामुळे धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांची अडचण झाली असून, कॉँग्रेस त्याचा लाभ उठविण्याची शक्यता आहे.

 Probation of Pragya Singh's candidature | प्रज्ञासिंहच्या उमेदवारीचे पडसाद

प्रज्ञासिंहच्या उमेदवारीचे पडसाद

Next

मालेगाव : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह यांना भाजपतर्फे भोपाळमधून उमेदवारी देण्यात आल्याने त्याचे पडसाद मालेगाव शहरात उमटले. भाजपच्या या निर्णयामुळे धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांची अडचण झाली असून, कॉँग्रेस त्याचा लाभ उठविण्याची शक्यता आहे.
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीने कॉँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मालेगाव मध्य मतदार संघात मुस्लीम मतदारांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. त्याचा फायदा साहजिकच धुळे लोकसभा मतदारसंघातील कॉँग्रेस-राष्टÑवादी महाआघाडीचे उमेदवार कुणाल पाटील यांना होण्याची शक्यता आहे.
धुळे लोकसभा निवडणुकीसाठी मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य अशा दोन्ही मतदारसंघात मिळून २ लाख १४ हजार ७५ मतदार आहेत. मालेगाव मध्य विधानसभा मतदार संघात एकूण १ लाख ३ हजार ४०१ मतदार असून, त्यात ४९ हजार ८७६ पुरुष आणि ५३ हजार ५२५ महिला मतदारांचा समावेश आहे. मालेगाव बाह्य मतदारसंघात १ लाख १० हजार ६७४ मतदार असून, त्यात ५४ हजार ६१८ पुरुष आणि ५० हजार ५६ महिला मतदारांचा समावेश आहे. मालेगाव मध्य मतदारसंघातील मतदार नेहमीच कॉँग्रेस सोबत राहिला आहे. प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीने स्थानिक निवडणुकीची समीकरणे बदलणार असून, काही प्रमाणात मध्य मतदारसंघातून भाजपबरोबर जाणारे अत्यल्प मतदानही आता भाजपपासून दुरावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मालेगाव बाह्य मतदारसंघात ग्रामीण भागात असलेला मुस्लीम मतदारदेखील भाजपपासून दूर जाऊन त्यांचे मतदान कॉँग्रेसला मिळण्याची शक्यता वाढली आहे.
जामिनावर मुक्तता
मालेगावी २९ सप्टेंबर २००८ रोजी भिक्कू चौकात बॉम्बस्फोट झाले होते. त्यात साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांना बॉम्बस्फोटाच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. त्यानंतर भाजपचे सरकार केंद्रात सत्तेवर आल्यानंतर साध्वी प्रज्ञासिंह यांची प्रकृती खालावल्याने त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती.
उमेदवारीला देणार आव्हान
सध्या लोकसभा निवडणुकीत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्याचा लाभ उठविण्यासाठी भाजपने प्रज्ञासिंह यांना भोपाळमधून तिकीट देऊन निवडणूक मैदानात उतरविल्याने मालेगावातील बॉम्बस्फोटात ठार झालेल्या मृतांच्या नातेवाइकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रज्ञासिंह यांना भाजपने दिलेल्या उमेदवारीस आव्हान देत त्यांच्या उमेदवारीच्या विरोधात बॉम्बस्फोटातील पीडितांचे नातेवाईक उच्च न्यायालयात धाव घेऊन पीटिशन दाखल करणार असल्याचे सांगितले जाते.

Web Title:  Probation of Pragya Singh's candidature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.