निवडणूक तयारीचा ‘हल्लाबोल’!

By किरण अग्रवाल | Published: February 18, 2018 01:37 PM2018-02-18T13:37:35+5:302018-02-18T13:40:01+5:30

आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर शिवसेना व त्यांच्या सहयोगी भाजपाने यासंदर्भातील तयारीला व जोर आजमावणीला प्रारंभ करून दिल्याचे दिसून येत आहे.

Preparation of election is 'attack'! | निवडणूक तयारीचा ‘हल्लाबोल’!

निवडणूक तयारीचा ‘हल्लाबोल’!

Next
ठळक मुद्देहल्लाबोल मोर्चामुळे पुन्हा उभारी मिळण्याची अपेक्षा हल्लाबोलच्या माध्यमातून सरकारी धोरण व वास्तवातील तफावती मतदारांसमोर मांडण्याची संधीस्थानिक राजकारण पाहता राष्ट्रवादीसाठी भुजबळ हेच सबकुछ होते

ज्येष्ठ नेते छगन भुजबळ ‘आत’ असल्याने नेतृत्वहीन झालेल्या व परिणामी काहीशा गारठलेल्या जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या हल्लाबोल मोर्चामुळे पुन्हा उभारी मिळण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, भुजबळांच्या अनुपस्थितीत त्यांच्याच मतदारसंघातून उत्तर महाराष्ट्रातील या मोर्चाची सुरुवात करून भुजबळ यांना पक्षाने वा-यावर सोडून दिले नसल्याचा संकेतही दिला गेल्याचे म्हणता यावे.
आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर शिवसेना व त्यांच्या सहयोगी भाजपाने यासंदर्भातील तयारीला व जोर आजमावणीला प्रारंभ करून दिल्याचे दिसून येत आहे. जमेल तिथे व संधी मिळेल तिथे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांना कोंडीत पकडत आपापले ‘इरादे’ स्पष्ट करून दिले आहेत. या विभक्ततेकडे संधी म्हणून पाहत राष्ट्रवादीनेही निवडणुकीच्या तयारीला लागणे स्वाभाविक आहे. अर्थात, राज्य शासनाच्या नाकर्तेपणाची टीका करीत यापूर्वीही काँग्रेस व राष्ट्रवादीने संयुक्तपणे गेल्या विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनादरम्यान मोर्चा काढला होता व सत्तेत नसलो तरी, स्वस्थ बसून नसल्याचा संकेत दिला होताच. आता ग्रामपातळीवर कार्यकर्त्यांत आलेले नैराश्य झटकून त्यांना कामाला लावतानाच राज्य शासन कसे भानावर नाही, त्यामुळे आपल्याला रस्त्यावर उतरावे लागले आहे; हे जनतेला सांगण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे ‘हल्लाबोल’ केला जात आहे. स्पष्टपणे सांगायचे तर हा निवडणूकपूर्व मशागतीचा भाग आहे. ही मशागत पक्षांतर्गत कार्यकर्त्यांच्या मनाची होणार आहे, तशी मतदारांच्या मतनिर्धारणाचीही होणे अपेक्षित आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकरी राजाबाबत उदारता दर्शवित भाजपाचा जो ‘चलो गाव की ओर’चा इशारा उघड होऊन गेला आहे, तो या गावपातळीवर संघटनात्मकदृष्ट्या व सहकाराच्या माध्यमातून आजही टिकून असलेल्या दोन्ही काँग्रेसवर परिणाम करण्यापूर्वीच त्याबाबतच्या वास्तवाची उकल करून सांगावी लागणार आहे. राज्यातील शेतकरी कर्जमाफी प्रकरणातील आकड्यांची चकवाचकवी समोर आहेच, म्हणूनच तर राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे त्याला सत्यनारायणाचा प्रसाद संबोधत आहेत. तेव्हा राष्ट्रवादीने राजकीय मशागत करताना हल्लाबोलच्या माध्यमातून सरकारी धोरण व वास्तवातील तफावती मतदारांसमोर मांडण्याची संधी घेतली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, जिल्ह्यातील स्थानिक राजकारण पाहता राष्ट्रवादीसाठी भुजबळ हेच सबकुछ होते. परंतु अपसंपदेप्रकरणी त्यांना कारागृहात जावे लागल्यानंतर या पक्षाचा जणू कणाच गेला. स्थानिक स्वराज्य संस्थांत पिछेहाट झालीच, शिवाय सर्वमान्यता लाभेल, असे नेतृत्वही उरले नाही. त्यामुळेच मध्यंतरी जितेंद्र आव्हाड व त्यांच्या पाठोपाठ जयंत पाटील यांच्याकडे जिल्ह्याचे निरीक्षकपद सोपवून पक्ष सावरण्याचे प्रयत्न केले गेलेत. मात्र ते होत असतानाच ज्या भुजबळांनी पक्षासाठी वेळोवेळी मोठे योगदान दिले, त्यांच्या अडचणीच्या काळात पक्षाने त्यांना वा-यावर सोडून दिले अशी भावना भुजबळ समर्थकांमध्ये बोलून दाखविली जाऊ लागली होती, म्हणूनच भुजबळ समर्थकांकडून राज्य सरकारच्या विरोधात केल्या गेलेल्या सत्याग्रह आंदोलनात व त्यानंतरच्या ‘अन्याय पे चर्चा’ उपक्रमात राष्ट्रवादीचे नेते हिरिरीने सहभागी होताना दिसले. ‘हल्लाबोल’ मोर्चाचा येवल्यात श्रीगणेशा करून सर्वच नेत्यांनी भुजबळांचा नामजप केल्याचे पाहता, त्यातूनही यासंबंधीचा (गैर)समज दूर करण्याचाच पक्षाचा प्रयत्न दिसून आला. यात खासदार सुप्रिया सुळे यांनी येवल्याला माहेरची व भुजबळ यांना पित्याची उपमा दिल्याने उभयतांमधील बंध अधिक गहिरे होण्यास मदत व्हावी. अर्थातच, हे बंध केवळ व्यक्तिगतदृष्ट्याच नव्हे तर, भुजबळ नेतृत्व करीत असलेल्या वर्गविशेषाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे, हे येथे वेगळे सांगण्याची गरज नसावी.
एकूणच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाच्या निमित्ताने अजित पवार, मुंढे, सुळे, जयंत पाटील, आव्हाड यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रवक्ते नवाब मलिक आदी वरिष्ठ नेते एकत्रपणे दौ-यावर आल्याने पक्षातील स्थानिक पातळीवरील मरगळ झटकली जाणार असून, शासन जे चित्र समोर मांडते आहे, तेच खरे नसल्याचा आरोप केला जात असल्याने मतदारांच्या विचारांनाही चालना मिळून जाण्याची अपेक्षा आहे.


 

 

Web Title: Preparation of election is 'attack'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.