पेठच्या ‘त्या’ बालगृहातील मुलींचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 03:54 PM2017-08-18T15:54:21+5:302017-08-18T15:54:36+5:30

peth,remand,home,girl,transfer | पेठच्या ‘त्या’ बालगृहातील मुलींचे स्थलांतर

पेठच्या ‘त्या’ बालगृहातील मुलींचे स्थलांतर

Next


नाशिक : गेल्या महिन्यात उघडकीस आलेल्या पेठ येथील बालसदन गृहातील मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर तेथे राहणाºया अन्य मुलींच्या सुरक्षिततेचा विचार करून महिला व बाल कल्याण विभागाने बालसदन गृहातील ५८ मुलींचे नाशकात स्थलांतर केले आहे. या मुलींना नाशिकमधील शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळवून देण्यात आला असून, आधाराश्रम व रिमांड होम येथे त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
पेठ येथे महिला हक्क संरक्षण समिती संचलित अनाथ मुलींचे बालगृह चालविले जात होते. सुशीला अलबाड ह्या त्या संस्थेच्या अध्यक्ष असून, त्यांच्या मुलाने या बालसदनात राहणाºया एका अल्पवयीन मुलीवर २०१५ पासून सातत्याने अत्याचार केल्याची घटना घडली होती. सदर मुलगी सज्ञान झाल्यानंतर तिची रवानगी नाशिकच्या वात्सल्य आधाराश्रमात करण्यात आल्यावर तिने आपल्यावर गुदरलेला प्रसंग तेथील रेक्टरच्या कानी घातल्यानंतर या प्रकरणाला वाच्यता फुटली होती. या प्रकरणी १२ जुलै रोजी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येऊन अलबाड यांच्या मुलाला अटक करण्यात आली. त्याचबरोबर त्याच्या या कृत्याला फूस दिल्याप्रकरणी सुशीला अलबाड यांनाही सहआरोपी करण्यात आले. पेठच्या बालगृहात अनाथ मुलींच्या शिक्षणाची व राहण्याची व्यवस्था असल्याने सहा ते अठरा वयोगटाच्या जवळपास ५८ मुलींचे याठिकाणी वास्तव्य होते. संस्थाचालकाकडूनच लैंगिक छळ होत असल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत महिला व बालकल्याण विभागाने या बालगृहाला भेट देऊन तेथे राहणाºया अन्य मुलींचे जाबजबाब नोंदवून घेण्याबरोबरच त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेतली होती. या मुलींचे शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या हेतूने शासनाने त्यांची सुरक्षित ठिकाणी रवानगी करण्याचा निर्णय घेऊन ५८ मुलींना नाशकात हलविले. जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी सुरेखा पाटील यांनी या सर्व मुलींची वयोगटाच्या हिशेबाने आधारश्रम तसेच उंटवाडीच्या रिमांड होममध्ये व्यवस्था केली असून, त्यांना नजीकच्या शाळेत प्रवेशही मिळवून दिला आहे. पेठच्या ‘त्या’ बालगृहाची मान्यताही रद्द करण्यात आली आहे.

Web Title: peth,remand,home,girl,transfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.