Onion production hovering due to slowdown in demand and shortage of large quantity of onion onion. | परदेशात कमी झालेली मागणी व रांगड्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात झालेले उत्पादन भावातील घसरणीमुळे कांदा उत्पादक हवालदिल

ठळक मुद्देशेतकरी सुखावला होता उत्पादकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया

औंदाणे : परदेशात कमी झालेली मागणी व रांगड्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात झालेले उत्पादन यामुळे एका क्विंटलला चार हजारापर्यंत पोहोचलेले कांद्याचे दर अडीच हजारांपर्यंत घसरल्याने कांदा उत्पादकांमध्ये नाराजीचा सूर उमटला. या घसरलेल्या भावाची व कांदा उत्पादकांमध्ये असलेल्या नाराजीची दखल घेत केंद्र सरकारने पहिल्यांदाच निर्यातमूल्य शून्य केल्याची घोषणा केल्याने कांदा उत्पादकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. बाजारपेठेत चारशे ते पाचशे रुपये क्विंटलला विकला जाणारा कांदा गेल्या काही महिन्यांमध्ये साडेचार हजार रुपयांपर्यंत विकला गेल्याने कांदा उत्पादक शेतकरी सुखावला होता. चालू वर्षी मुसळधार पावसामुळे कांद्याच्या रोपांना मोठा फटका बसला तर तयार झालेला कांदा पावसात भिजला; मात्र उशिरा लागवड केलेल्या रांगडा कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात निघाल्याने हा कांदा विक्रीसाठी बाजारपेठेत आल्याने मागणी कमी व पुरवठा जास्त अशी परिस्थिती झाली. त्यामुळे कांद्याचे भाव साडेचार हजारांवरून अडीच हजार रुपयांपर्यंत घसरले गेले. हे भाव अजून कमी होणार या धास्तीने कांदा उत्पादकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. या घसरलेल्या दराची केंद्र सरकारने त्वरित दखल घेत भाव स्थिर राहण्यासाठी निर्यातमूल्य शून्य केल्याची घोषणा केली. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कांद्याला हवा असा बाजारभाव मिळाला नव्हता; मात्र गेल्या काही महिन्यांपासून कांद्याला चांगला बाजारभाव मिळाल्याने यंदा रांगडा कांद्याची लागवड झाली होती.