ठळक मुद्देधान्य गोरगरिबांना वाटप एकूण ६२ सुनावणी घेण्यात आल्यादुकानांना आधार कार्डशी लिंक

नाशिक : आपण मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून सहाही महसुली विभागात जाऊन पुरवठा खात्याच्या सुनावणींचा कार्यक्रम हाती घेतला. जेणेकरून सरकार आपल्या दारी हा हेतू साध्य होईल. या काळात १० ते १२ लाख बोगस रेशन कार्ड उघडकीस आणल्याचा दावा अन्न औषध व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत केला.
दरम्यान, या बोगस रेशन कार्डवरील बचत झालेले चार ते पाच कोटी रुपयांचे धान्य गोरगरिबांना वाटप करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. नाशिक विभागाची पुरवठा विभागाची बैठक घेण्यासाठी ते नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर आले होते. नाशिक विभागातील ४९ धान्य वितरणाच्या सुनावणी, चार वैद्यकीय मेडिकल दुकानांच्या सुनावणींसह एकूण ६२ सुनावणी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आजपर्यंतच्या तीन वर्षांच्या काळात रेशनसह अन्य दुकानदारांकडून ६६ लाख १३ हजारांचा दंड वसूल केला आहे. तसेच अनेक दुकानांचे परवाने रद्द केले आहेत. राज्यातील ५२ हजारांपैकी ५० हजार दुकानांवर मशीन बसविण्यात आले असून, लवकरच सर्व दुकानांना आधार कार्डशी लिंक करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात बोगस रेशन कार्ड तपासणी मोहिमेत जवळपास १० ते १२ लाख बोगस रेशन कार्ड शोधण्यात आले. त्यातून चार ते पाच कोटी धान्याची बचत झाली असून, हे बचत झालेले धान्य लवकरच गोरगरिबांना वाटप करण्यात येणार आहे. अन्न धान्य घोटाळ्यात नाशिकला इतिहासात पहिल्यांदाच धान्य घोटाळ्यातील आरोपीला मोका लावण्यात आला. राज्यात बहुतांश गुदामांमध्ये व वाहतूक वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली असून, धान्य कोठून उचलले, कुठे चालले, वाहन कुठे थांबले, याची माहिती पुरवठा खात्याला मिळणार आहे. उत्तर प्रदेशात छापा टाकल्यानंतर पेट्रोलपंपावर बिघाड करून पेट्रोलच्या मापात बेकायदेशीर फेरफार करण्यात येत असल्याचे ठाणे येथून उघड झाले आहे. तेव्हापासून पेट्रोल पंपांवर पुरवठा विभागाच्या मदतीने क्लिप बसविण्यात आली आहे. त्यामुळे पेट्रोल कंपन्यांसह पेट्रोलपंपचालक पेट्रोल पंपांवर काहीही फेरफार करू शकत नाही. यावेळी पत्रकार परिषदेत आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, भाजपा प्रदेश प्रवक्ते सुहास फरांदे, जिल्हाध्यक्ष दादा जाधव आदी उपस्थित होते.