आता प्रश्न, उद्याचे काय?

By किरण अग्रवाल | Published: May 20, 2018 01:22 AM2018-05-20T01:22:57+5:302018-05-20T15:24:16+5:30

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातले मतदान होणे बाकी असतानाच उद्याची, म्हणजे आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या समीकरणांची चर्चा सुरू होऊन गेली आहे. भुजबळ पुन्हा उमेदवारी करणार का, ‘मनसे’ची भूमिका काय असेल तसेच भाजपाचा उमेदवार कोण असेल, यासंदर्भाने ही उत्सुकता आहे. तसा या निवडणुकीला अजून काही अवधी असला तरी राजकीय मशागतीला यानिमित्ताने प्रारंभ होऊन गेल्याचे म्हणता यावे. 

Now the question, what about tomorrow? | आता प्रश्न, उद्याचे काय?

आता प्रश्न, उद्याचे काय?

googlenewsNext
ठळक मुद्दे भुजबळ पुन्हा उमेदवारी करणार का राजकारणात अपरिवर्तनीय असे काहीच नसते. सारेच राजकारणी एकाच माळेचे मणी आहेत,

खरे तर उद्याचे काय, हा प्रश्न उद्या होत असलेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीसंबंधी नाहीच; पण या निवडणुकीच्या निमित्ताने जे राजकारण बघावयास मिळाले ते भविष्यात होऊ घातलेल्या निवडणुकांची चुणूक दाखवून देणारेच असल्याने; त्याअर्थाने उद्याचे काय याबाबतचे स्वारस्य सर्वसामान्यांच्याच नव्हे तर खुद्द राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्याही मनात जागून गेले आहे. 

राजकारणात अपरिवर्तनीय असे काहीच नसते. कालचे मित्र आज विरोधक होतात तर आजचे विरोधक उद्याचे मित्र, हा तर शिरस्ताच होऊन गेला आहे. पूर्वीसारखे नीती-तत्त्वांचेही ओझे आजकाल कुणी बाळगताना फारसे दिसत नाही. त्यामुळे कुणाच्या पक्षांतराकडे आश्चर्याने पाहता येऊ नये, तसे निवडून आलेला कुणी त्याच्या पक्षाशी इमान राखूनच वागेल असेही समजता येऊ नये. सत्ता व संधी हेच सायांचे उद्दिष्ट असल्याने राजकीय रंगमंचावर रोजच वेगवेगळ्या नाटकांचे अंक पार पडताना दिसून येतात. उद्दिष्टपूर्तीसाठी निघताना भलेही हाती वेगवेगळे झेंडे घेतले जातात; पण नंतर मात्र सारे एकाच बसचे प्रवासी बनतात असेही बघावयास मिळते. सारेच राजकारणी एकाच माळेचे मणी आहेत, अशी जी सामान्यांची मानसिकता बळावते आहे तीदेखील त्यामुळेच. अशा आजच्या राजकीय व्यवस्थेत कसल्या निवडणुका लागतात तेव्हा त्यानिमित्ताने जे राजकारण घडून येते त्यातून येणारा अनुभवही याच समजाला बळकटी देणारा ठरतो. शिवाय भविष्याचे काहीसे आडाखेही त्यावरून बांधता येऊ शकतात. उद्या मतदान होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीदरम्यानही अशा अनेक घडामोडी घडल्या, ज्यातून काही संकेत नक्कीच घेता यावेत. लोकसभा असो किंवा विधानसभेच्या निवडणुका, त्यांना तसा अजून अवकाश असला तरी चालू निवडणुकीच्या प्रचारात वा त्या संदर्भात जे जे काही घडून आलेले दिसले त्यातून उद्याचे नगारेही वाजून गेले आहेत. स्थानिक निवडणुकीप्रमाणे कर्नाटकात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीचीही पार्श्वभूमी यास लाभून गेली आहे. नाही तरी, राजकारणातल्या लोकांना कायम गुंतलेपण अपेक्षित असते, हाती वेळ असला तरी या नगाºयांचा आवाज त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठीचे मतदान होण्यापूर्वीच उद्याचे काय, असा प्रश्न औत्सुक्याचा ठरून गेला आहे.


राजकारणातील अनिश्चितता व बेभरोसा पाहता उद्या काय होईल हे आज सांगणे तसे अवघड असले तरी, काही अंदाज बांधता यावेत. यातील पहिला अंदाज म्हणजे, एकूणच देश पातळीवरील ‘वारे’ पाहता भाजपाशी दोन हात करण्यासाठी आता विधान परिषदेसाठी केली गेली तशी राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी असेल. परिणामी लोकसभेच्या नाशिकच्या जागेसाठी राष्ट्रवादीचीच दावेदारी असेल. यात गेल्यावेळी काहीशा अनिच्छेनेच छगन भुजबळ यांनी उमेदवारी केली होती, यंदा त्यांचे काय, हा खरा प्रश्न राहणार आहे. त्यांच्या एवढा मातब्बर उमेदवार आज पक्षाकडे नसल्याने त्यांनाच गळ घालून सहानुभूतीचा लाभ उचलण्याचा पक्षाकडून प्रयत्न होईलच; पण खुद्द भुजबळ पुन्हा या परीक्षेला बसतात का यावरच एकूण चित्र अवलंबून आहे. भुजबळ तयार नसतील तर राष्ट्रवादीत दावेदार अनेक आहेत; पण परीक्षा सोपी नसल्यानेच काळजीचा विषय असेल. 

दुसरे म्हणजे, मागे गुजरातच्या साबरमतीला जाऊन मोदींचे गुणगान केलेल्या व त्या धर्तीवर नाशिकच्या गोदा पार्कची आखणी करणाया राज ठाकरे यांनाही आता मोदींचे राजकारण अळणी वाटू लागले आहे. त्यामुळे त्यांनीही मोदींविरोधात समविचारी आघाडीची गरज बोलून दाखविली आहे. गेल्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीत ‘मनसे’च्या उमेदवाराची अनामत जप्त झाली होती. शिवाय, स्वत: राज यांच्यात ‘करिश्मा’ करून दाखविण्याची क्षमता असली तरी, स्थानिक पातळीवर पक्ष संघटनात्मक स्थिती फारशी समाधानकारक नाहीच. त्यामुळे विधानसभेचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याकडून लोकसभेसाठी मोदी विरोधकांपाठी पक्षाचे बळ उभे करण्याची अपेक्षा केली जाणे गैर ठरू नये. भाजपाविरोधात शिवसेनाही लढणार आहे; परंतु शिवसेनेशी ‘मनसे’चे जमणे शक्य नसल्यानेच राष्ट्रवादीला त्यांच्या पाठिंब्याची शक्यता गृहीत धरता येणारी आहे. अर्थात, या साया जर-तरच्याच गोष्टी आहेत. यातील नेमके काय होईल हे पाहण्यासाठी थोडे थांबावेच लागणार आहे.

शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी शेंडी तुटो वा पारंबी, आता युती नाही अशी भूमिका ठणकावून सांगितली असल्याने लोकसभेसाठी ‘युती’ राहण्याची शक्यता जवळपास संपुष्टातच आली आहे. विधान परिषदेच्या चालू निवडणुकीसाठी परस्परांच्या जागांवर आडवे न जाण्याचे धोरण उभयतांनी घेतले असले तरी ‘युती’ नाही. पालघरच्या पोटनिवडणुकीसाठी काय झाले ते सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळेच नाशिकला विधान परिषदेच्या रिंगणातील शिवसेना उमेदवारास अखेरपर्यंत भाजपाचा स्पष्ट पाठिंबा लाभू शकला नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच पुन्हा तिकिटाची अपेक्षा असली तरी राष्ट्रवादीप्रमाणेच भाजपाच्याही उमेदवाराशी त्यांना टक्कर द्यावी लागेल. हा भाजपाचा उमेदवार कोण असेल, हादेखील औत्सुक्याचाच विषय आहे. सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे हे त्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात असले तरी, चांदवडचे आमदार व नाशिक निवासी डॉ. राहुल आहेर यांचेही नाव त्यासाठी घेतले जात आहे. अर्थात, भाजपातील उमेदवारी वाटपाची विद्यमान व्यवस्था पाहता अमितभाई शहा व मोदी यांच्या जोडगोळीने आणखीन पर्यायी नवीनच नाव पुढे आणून धक्का दिल्यास आश्चर्य वाटू नये. शेवटी राजकारणातील यशातही ‘भक्त संप्रदाय’ हल्ली महत्त्वाची भूमिका बजावू लागला आहे. शिरगणती वाढविण्यासाठी तेच पाहिले जाते. तेव्हा येऊ घातलेल्या निवडणुकांचे घोडा-मैदान जवळ असले तरी उद्याचे काय हा प्रश्न प्रत्येकच राजकीय पक्षाच्या भूमिकेसंदर्भाने उत्सुकतेचा ठरला आहे.

Web Title: Now the question, what about tomorrow?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.