पाणीपट्टी थकविणाऱ्या  ५७ हजार ग्राहकांना नोटीसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 07:10 PM2017-11-01T19:10:47+5:302017-11-01T19:12:01+5:30

महापालिकेचा अल्टीमेटम : सहा कोटी रुपयांची वसुली

 Notice to 57 thousand customers of water stock exhaustion | पाणीपट्टी थकविणाऱ्या  ५७ हजार ग्राहकांना नोटीसा

पाणीपट्टी थकविणाऱ्या  ५७ हजार ग्राहकांना नोटीसा

Next
ठळक मुद्देबंद केलेली जोडणी अनधिकृतपणे पुन्हा सुरू केल्यास संबंधितांवर पोलिसांत गुन्हा दाखल केला जाणार१० हजार ५५० नळजोडणीधारकांनीच थकबाकीचा भरणा भरण्यास प्रतिसाद दिला

नाशिक : महापालिकेने पाणीपट्टीची थकबाकी असलेल्या ६७ हजार ८३८ नळजोडणीधारकांना नोटिसा बजावल्या असून, त्यातील १० हजार ५५० थकबाकीदारांकडून ६ कोटी १७ लाखांची वसुली करण्यात आली आहे. अद्याप ५७ हजार थकबाकीदारांनी भरणा न केल्याने संबंधितांची नळजोडणी बंद केली जाणार आहे. याशिवाय बंद केलेली जोडणी अनधिकृतपणे पुन्हा सुरू केल्यास संबंधितांवर पोलिसांत गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली आहे.
महापालिकेने करवसुलीसाठी थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. पाणीपट्टी थकविणाऱ्या  ६७ हजार ८३८ नळजोडणीधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यातील १० हजार ५५० नळजोडणीधारकांनीच थकबाकीचा भरणा भरण्यास प्रतिसाद दिलेला आहे. सदर थकबाकीदारांकडून ६ कोटी १७ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. जे नळजोडणीधारक १५ दिवसांच्या आत थकबाकीची रक्कम भरणार नाहीत, अशा नळजोडणीधारकांची जोडणी बंद करण्याची कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, महापालिकेने एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ या सात महिन्यांच्या कालावधीत १९ कोटी ९७ लाख रुपये पाणीपट्टी वसूल केलेली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीपट्टी वसुलीत ९ कोटी २९ लाख रुपयांनी वाढ झालेली आहे. सर्वाधिक पाणीपट्टीची वसुली सिडको विभागातून ४ कोटी ७८ लाख रुपये झाली आहे, तर सातपूर विभागातून २ कोटी ५ लाख, पश्चिममधून ३ कोटी, पूर्वमधून ३ कोटी ५१ लाख, पंचवटीतून २ कोटी ७१ लाख, नाशिकरोडमधून ३ कोटी ८९ लाख रुपयांची वसुली झालेली आहे. दरम्यान, महापालिकेमार्फत अद्यापही असंख्य नळजोडणीधारकांना पाणीपट्टीची बिले जाऊन पोहोचलेली नाही. सुमारे वर्षभराच्या कालावधीत पाणीपट्टीची बिले न मिळाल्याने सोसायट्या, अपार्टमेंट यांना येणाऱ्या  बिलाची रक्कम मोठ्या प्रमाणात असणार आहे. त्यामुळे महापालिकेकडे त्याबाबत विचारणा होण्याची शक्यता आहे.
इन्फो
मालमत्ता करात १२ कोटींनी वाढ
महापालिकेने गत वर्षाच्या तुलनेत १२ कोटी ५८ लाख रुपये जास्त घरपट्टीची वसुली केली आहे. गतवर्षी सात महिन्यांत ४५ कोटी १८ लाख रुपये मालमत्ताकर वसूल झाला होता. यंदा सात महिन्यांत ५७ कोटी ७६ लाख रुपये वसुली झाली आहे. महापालिकेने एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत सवलत योजना राबविली होती. या सवलत योजनेतूनच महापालिकेला ३४ कोटी ७५ लाख रुपये उत्पन्न प्राप्त झाले होते. त्यानंतरच्या चार महिन्यांत महापालिकेने २३ कोटी रुपये मालमत्ता कर वसूल केला आहे. सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्या  ७६४४ मिळकतधारकांना ७ लाख ८० हजारांची तर पाच, तीन आणि दोन या टक्केवारीतून ८९ लाख रुपये सवलत देण्यात आलेली आहे. ई पेमेंट करणाऱ्या  ४१ हजार ८२१ ग्राहकांना ६ लाख ४१ हजाराची सवलत देण्यात आलेली आहे.

Web Title:  Notice to 57 thousand customers of water stock exhaustion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.