Niphad is trying to break Bharat Petroleum's diesel channel | निफाडला भारत पेट्रोलियमची डिझेल वाहिनी फोडण्याचा प्रयत्न

ठळक मुद्देलाखो लिटर वाया : तज्ज्ञांकडून इंधन पुरवठा खंडीतडिझेल चोरीचा प्रयत्न उघडकीस

नाशिक : मनमाड नजिकच्या पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम कार्पोरेशनच्या मनमाड-मुंबई भुमीगत पाईप लाईन निफाड तालुक्यातील खानगाव थडी येथे फोडून त्यातून डिझेल चोरीचा प्रयत्न उघडकीस आला आहे. गुरूवारी पहाटे हा प्रकार लक्षात येताच भारत पेट्रोलियमच्या अधिका-यांनी व तज्ज्ञांनी तातडीने इंधन पुरवठा खंडीत करून पाईपलाईन जोडण्याचे काम सुरू केले असून, या घटनेमागे आंतराष्टÑीय टोळीचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पानेवाडीच्या भारत पेट्रोलियम कार्पोरेशनच्या इंधन डेपोतून मुंबईसह राज्याच्या सीमेला लागून असलेल्या सहा राज्यांना पेट्रोल, डिझेलचा पुरवठा केला जातो. त्यासाठी जमीनीखालून सुमारे सात ते आठ फूट खोल पाईपलाईन टाकण्यात आली असून, अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून डेपोतून अहोरात्र इंधन पुरवठा केला जातो. निफाड तालुक्यातील खानगाव थडी शिवारातील निर्जन व जंगल भागातून ही पाईपलाईन गेली असल्याने काही अज्ञात व्यक्तीने जमीनीत खड्डा करून पाईपलाईन फोडली व त्यातून इंधन चोरी करण्याचा प्रयत्न केला. गुरूवारी पहाटे ही बाब भारत पेट्रोलियम कंपनीच्या तांत्रिक विभागाच्या लक्षात येताच, त्यांनी त्याचा शोध घेतला असता, खानगाव थडी येथे हा प्रकार निदर्शनास आला. पाईपलाईन तोडण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आला असून, त्याच्या सहाय्याने सुमारे आठ फूट खोल खड्डा खणण्यात आला आहे. या खड्डयात मोठ्या प्र्रमाणात डिझेल साचलेले असल्याने चोरट्यांनी हजारो लिटर डिझेल गायब केल्याचाही संशय आहे.
इंधन वाहून नेणाºया पाईपलाईनच्या दाबावर परिणाम झाल्यानंतर गुरूवारी पहाटे पानेवाडीतून होणारा पुरवठा तात्काळ बंद करण्यात आला व यंत्राच्या सहाय्याने शोध घेऊन खानगाव थडी येथे सकाळी सुमारे ३० ते ३५ अधिकारी, कर्मचाºयांचे पथक दाखल झाले. जिल्हा प्रशासनाला याची माहिती मिळताच निफाडचे प्रांत अधिकारी महेश पाटील व त्यांच्यासहका-यांनीही घटनास्थळी धाव घेतली. ज्या ठिकाणी पाईपलाईन तोडण्यात आली आहे ते ठिकाण गोदावरी नदीपासून चारशे मीटर अंतरावर असून, सहजासहजी या भागात कोणी एकटा, दुकटा व्यक्ती जाऊ शकत नाही. शिवाय जमीनीखाली इतका मोठा खड्डा करण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागू शकतो त्यामुळे या घटनेमागे आंतराज्यीय टोळी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.