nashik,st,buses,attack,shivshahi,cancelled | नाशिकमधील सर्व मार्गांवरील एस.टी. बसेस रद्द

ठळक मुद्देदोन दिवसांत महामंडळाच्या १३ बसेसचे नुकसान, पुणे येथे शिवशाही बस पोहचू शकलेल्या नाहीत. बुधवारी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या

नाशिक बंद : दोन दिवसांत १३ गाड्यांचे नुकसान
नाशिक : भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या. सकाळच्या सत्रात काही गाड्या सोडण्यात आल्या होत्या; परंतु दुपारनंतर वातावरण चिघळल्याने आणि महामंडळाच्या दोन बसेसच्या काचा फोडण्यात आल्यामुळे सर्वच मार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली. दरम्यान, कालपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे दोन दिवसांत महामंडळाच्या १३ बसेसचे नुकसान झाले आहे. दर दोन तासांनी घटनेचा आढावा घेतला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे एस.टी. महामंडळाचे कोट्यवधींचे उत्पन्न बुडाले असून, अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. राज्यातील परिस्थिती चिघळल्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यादेखील थांबविण्यात आल्या आहेत. कालपासून मुंबई, पुणे येथे शिवशाही बस पोहचू शकलेल्या नाहीत. बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंदमुळे तर सकाळपासून लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात आलेल्या नाहीत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बससेवाही तूर्तास थांबविण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकहून मालेगाव, मनमाड, सटाणा, लासलगाव, येवला, सिन्नर, पिंपळगाव, नांदगाव, पेठ, कळवण, इगतपुरीकडे होणारी वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली आहे. नाशिकहून बस सोडली जात नाहीच, शिवाय कालपासून परतीच्या गाड्याही आहे तेथेच थांबविण्यात आल्या आहेत.
राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने शिवशाही बसेस पूर्णपणे रद्द करण्याचे कालच आदेशित केले होते. त्यामुळे राज्यातील सर्वच शिवशाही बसेस रद्द करण्यात आल्या होत्या. लाल पिवळ्या गाड्या काही प्रमाणात सुरू ठेवण्यात आल्या; मात्र राज्यात अनेक ठिकाणी बसेसवर हल्ला झाल्याने या बसेसही बंद करण्यात आल्या आहेत. त्यातच महाराष्टÑ बंदची हाक दिल्याने बुधवारी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मंगळवारी जिल्ह्यात ११ गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या, तर बुधवारी दोन बसेस फोडण्यात आल्यामुळे नुकसानग्रस्त बसची संख्या १३ इतकी झाली आहे.