नाशिक महापालिका अतिरिक्त पाण्यावर ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 01:26 AM2018-10-20T01:26:07+5:302018-10-20T01:26:40+5:30

नाशिक शहराच्या लोकसंख्येचा विचार करता, गंगापूर, दारणा व मुकणे धरणातून पिण्यासाठी सुमारे ४६०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित ठेवण्यावर महापालिका ठाम असून, जिल्हाधिकाऱ्यांनी उपलब्ध पाणीसाठ्यातून ३९०० दशलक्ष घनफूट पाणी देण्याची तयारी दर्शवित, अतिरिक्त पाणी कशासाठी?

 Nashik municipality firmly on the excess water | नाशिक महापालिका अतिरिक्त पाण्यावर ठाम

नाशिक महापालिका अतिरिक्त पाण्यावर ठाम

Next

नाशिक : नाशिक शहराच्या लोकसंख्येचा विचार करता, गंगापूर, दारणा व मुकणे धरणातून पिण्यासाठी सुमारे ४६०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित ठेवण्यावर महापालिका ठाम असून, जिल्हाधिकाऱ्यांनी उपलब्ध पाणीसाठ्यातून ३९०० दशलक्ष घनफूट पाणी देण्याची तयारी दर्शवित, अतिरिक्त पाणी कशासाठी? असा सवाल केल्यामुळे शुक्रवारी पाणी आरक्षणाच्या पूर्वतयारीच्या बैठकीत नाशिक महापालिकेच्या पाण्यावर तोडगा निघू शकला नाही. जिल्ह्यातील धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यातून जवळपास ८० टक्के पाण्याचे नियोजित आरक्षण करण्यात आले असून, त्यावर अंतिम निर्णय पालकमंत्री घेणार आहेत.  नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचे पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी आरक्षण ठेवण्यासाठी सर्व पाणीवापर यंत्रणाकडून पाण्याची मागणी मागविण्यात आली होती. त्यानुसार सर्वांनी आपली मागणी कळविली असली तरी यंदा धरणांमध्ये ५२ हजार दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध असून, धरणांच्या एकूण क्षमतेच्या तुलनेत त्याची टक्केवारी ७७ आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास १४ टक्के पाणी कमी असले तरी, गेल्या वर्षी ज्या प्रमाणात प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, औद्योगिक वसाहती, रेल्वे, एचएएल, नगरपालिका, मेरी, एकलहरे औद्योगिक वसाहत यांना पाणी दिले होते. तितकेच पाणी यंदाही धरणातून आरक्षित करण्याचे ठरविण्यात आले. गेल्या वर्षी पिण्यासाठी १३,९३२ दशलक्ष घनफूट इतके पाणी आरक्षित करण्यात आले. यंदा त्यात थोडे फार बदल करण्यावर एकमत झाले.  या बैठकीत जिल्हाधिकाºयांनी मनपा अधिकाºयांना पाण्याच्या वापराचे गणित विचारले. शहरातील लोकसंख्या २० लाख इतकी धरली तरी, दरडोई पाणी वापराचा विचार करता, ३९०० दशलक्ष घनफूट पाणीदेखील पुरेसे असल्याचे सांगण्यात आले. शिवाय मुकणे धरणातून यंदा पाणी उचलण्यात येणार असले तरी, त्याची क्षमता व चाचणीचा विचार करता त्या पाण्याचा विचार न करण्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.
टॅँकरसाठी पाणी राखीव
यंदा आॅक्टोबर महिन्यातच जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून, नजीकच्या काळात पाणीपुरवठा योजनांसाठी पाण्याचे नव्याने उद्भव निर्माण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे धरणातील पाण्याचे योजनांसाठी आरक्षण करताना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी टॅँकर भरण्यासाठीदेखील पाणी आरक्षित करण्यावर या बैठकीत विचार करण्यात आला. हरणबारी, केळझर, चणकापूर या धरणांवर अवलंबून असलेले तालुके व योजना तसेच तेथे भेडसाविणारी पाणीटंचाई याचा विचार करण्याबरोबरच पाणी आत्तापासूनच काटकसरीने वापरण्याचे आवाहन करण्यात आले. माणिकपुंज, नाग्यासाक्या या धरणांमध्ये जेमतेम पाणी असल्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या योजनांसाठी अन्य धरणांतून पाण्याचे नियोजन करण्यात आले.
नाशिक महापालिकेने गंगापूर धरणातून ४००, दारणातून ३०० व मुकणेतून ३०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्याची मागणी केली. त्यासाठी शहरातील वाढीव लोकसंख्या व स्मार्ट सिटींतर्गत चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचे कारण दर्शविण्यात आले. गेल्या वर्षीही महापालिकेने जादा मागणी केली असली तरी, फक्त ३,९०० दशलक्ष घनफूट इतकेच पाणी देण्यात आले होते. त्यामुळे यंदा अधिकचे पाणी देण्यास जिल्हाधिकारी राजी नाहीत.

Web Title:  Nashik municipality firmly on the excess water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.