नाशिकमध्ये बिबट्याचा थरार; दोन तासांच्या प्रयत्नानंतर जाळ्यात, 4 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 10:27 AM2019-01-25T10:27:50+5:302019-01-25T14:59:55+5:30

भरवस्तीत बिबट्या शिरल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. गंगापूर रोडवरील सावरकर नगर येथील ही घटना आहे.

Nashik : Leopard strays into populated residential colony, attacks four | नाशिकमध्ये बिबट्याचा थरार; दोन तासांच्या प्रयत्नानंतर जाळ्यात, 4 जण जखमी

नाशिकमध्ये बिबट्याचा थरार; दोन तासांच्या प्रयत्नानंतर जाळ्यात, 4 जण जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देभरवस्तीत शिरला बिबट्याबिबट्याच्या हल्ल्यात 4 जण जखमीबिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू

नाशिक : गंगापूर रोड परिसरात शुक्रवारी (25जानेवारी) सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बिबट्या शिरल्याने एकच घबराहट पसरली होती. नागरिकांनी तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी नाशिक पश्चिम वनविभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले. बघ्यांची गर्दी आणि आरडाओरड्यामुळे बिबट्या बिथरला आणि लोकांवर हल्ला करू लागला. त्याच्या हल्ल्यात एका वनरक्षकासह दोन पत्रकार आणि शिवसेनेचा नगरसेवक जखमी झाला आहे. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. दोन तासांच्या थरारानंतर बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले.

टोलेजंग बंगले, रो हाऊस, उच्चभ्रू लोकवस्तीचा परिसर असलेल्या सावरकर नगर, शंकर नगर, पामस्प्रिंग कॉलनी भागात शुक्रवारी सकाळी बिबट्याचा थरार नागरिकांनी अनुभवला. शंकर नगर भागात बिबट्या सर्वप्रथम दिसला. तेथील मोकळ्या भुखंडातील गवताच्या आडोशाला बिबट्या लपून बसला होता. बघ्यांच्या गर्दी आणि त्यांच्या आरडाओरडमुळे बिबट्या बिथरला आणि मग त्यानं बंगल्यांच्या दिशेने धाव घेतली. 

10 ते 15 फुटांच्या भींती बिबट्याने सहज भेदत बंगल्यांच्या आवारात धुमाकूळ घातला. बंगल्यांच्या आवारात दडून बसण्याचा प्रयत्न करत असताना बिबट्याने चार जणांवर हल्ला केला. या हल्ल्यात प्रथम वनरक्षक उत्तम पाटील जखमी झाले. त्यानंतर नगरसेवक संतोष गायकवाड यांनी काठीने बिबट्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता चवताळलेल्या बिबट्याने त्यांच्या चेहऱ्यावर पंजा मारून मारवा बंगल्यात झेप घेतली. या बंगल्यात लपण्याची जागा शोधत असताना बिबट्याने चित्रिकरण करणा-या वृत्तवाहिनीचा छायाचित्रकार तबरेज शेखवर हल्ला करुन जखमी केले. त्यानंतर पत्रकार कपिल भास्कर यांच्यावरही बिबट्यानं हल्ला केला.  

पोलिसांच्या काठ्यांमुळे बिथरला बिबट्या
वनविभागाचे रेस्क्यू पथक एअर गनच्या सहाय्याने ‘ट्रॅन्क्यूलाईज’ करण्यासाठी योग्य संधी आणि जागेच्या विचार करत होते. याचदरम्यान बिबट्या दिसताच क्षणी पोलीस कर्मचारी त्याच्यामागे लाठ्या-काठ्या घेऊन धावत जात होते. यामुळे बिबट्याला ‘ट्रॅन्क्यूलाईज’ (बेशुद्ध) करताना अडचणी आल्या. वन परिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार यांनी तीन वेळा इंजेक्शन सोडले असता दोन इंजेक्शन बिबट्याला सुदैवाने लागल्यामुळे त्याची आक्रमकता कमी झाली. मारवा बंगल्याच्या गेटवर लावलेल्या जाळीमध्ये बिबट्या येऊन अडकल्याने रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.

जखमी नागरिकांची नावे 
1. संतोष गायकवाड, शिवसेना नगरसेवक
2. कपिल भास्कर, पत्रकार  
3. तबरेज शेख, वृत्तवाहिनीचे कॅमेरामन
4. उत्तम पाटील, वन रक्षक

 

Web Title: Nashik : Leopard strays into populated residential colony, attacks four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.