नामको बॅँकेला ४१ लाखांना गंडा : नाशिकमधील कारविक्री करणाऱ्या दालनांच्या नावांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 10:31 PM2018-04-25T22:31:13+5:302018-04-25T22:43:37+5:30

नोटिसांद्वारे खरेदी केलेली वाहने पडताळणीसाठी बॅँकेत हजर करावी, असे फर्मान सोडले; मात्र कर्जदारांनी कुठल्याही प्रकारे वाहनांची खरेदी न करता केवळ धनादेशाद्वारे रोकड लंपास केल्याचे उघडकीस आले.

NAMCO GETS 41 LAKHS TO BANK: The names used by cars dealers | नामको बॅँकेला ४१ लाखांना गंडा : नाशिकमधील कारविक्री करणाऱ्या दालनांच्या नावांचा वापर

नामको बॅँकेला ४१ लाखांना गंडा : नाशिकमधील कारविक्री करणाऱ्या दालनांच्या नावांचा वापर

googlenewsNext
ठळक मुद्देउगलेने भासविले स्वत:ला संचालक या प्रकरणामध्ये बॅँकेच्या कर्मचा-यांसह अधिका-यांवरही पोलिसांना संशय मोटार विक्री करणा-या दालनांच्या नावाने बनावट व नावांशी साम्य असलेले कार्यालय

नाशिक : वाहने खरेदी करण्यासाठी बनावट कागदपत्रे अंबड येथील नाशिक मर्चन्ट्स को-आॅप. बॅँकेच्या शाखेत देऊन कर्ज प्रकरणात सुमारे ४१ लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी सहा संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नामको बॅँकेचे अंबड शाखेचे शाखाधिकारी उमाजी गावित यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी विवेक अरुण उगले (रा. पाथर्डीफाटा), सुनील रुंजा धोंगडे (रा. कुरेगाव), सोमनाथ गेणू गव्हाणे (रा. सावतानगर), भास्कर परशराम नरवाडे (रा. आंबेबहुला), संगीता पंढरीनाथ कोंबडे, सुरेश गंगाधर कोंबडे (दोघे रा. पाथर्डीफाटा) यांनी संगनमताने बनावट कागदपत्रे तयार के ली. विविध नामांकित कंपन्यांच्या शोरूमच्या नावाने कोटेशनही बॅँकेच्या शाखेत सादर केले. तसेच टाटा कंपनीचा ट्रक खरेदीसाठी वीस लाख ८५ हजार, फियाट पुंटो इमोशन या कार खरेदीसाठी आठ लाख पन्नास हजार रु पये, टाटा सफारी कार खरेदीसाठी अकरा लाख चाळीस हजार रुपयांचे धनादेश नामको बॅँकेकडून शहरातील विविध नामांकित चारचाकी विक्री करणाºया कंपन्यांच्या दालनांच्या नावाने घेऊन पाथर्डीफाटा येथील स्टेट बॅँक आॅफ हैदराबाद शाखेतून तब्बल ४१ लाख रुपये स्वत:च्या वैयक्तिक खात्यावरून काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी संबंधित उगले याने स्वत:ला मोटार विक्री दालनाचा संचालक असल्याचे भासवले. दरम्यान, नामको बॅँकेकडे खोटी व बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, उपनिरीक्षक सुजित मुंढे करीत आहेत.

असा झाला उलगडा...
संशयित कर्जदारांनी कर्ज रकमेचा मासिक हप्त्याच्या रकमेचा धनादेश आयसीआयसीआय बॅँकेचा नामकोच्या अंबड शाखेला दिला. हा धनादेश बॅँकेने संबंधित बॅँकेकडे पाठविला; मात्र धनादेश वठू शकला नाही व तो नामको बॅँकेकडे परत आला. या प्रकरणी नामको व्यवस्थापनाने संबंधितांना नोटीस बजावली. नोटिसांद्वारे खरेदी केलेली वाहने पडताळणीसाठी बॅँकेत हजर करावी, असे फर्मान सोडले; मात्र कर्जदारांनी कुठल्याही प्रकारे वाहनांची खरेदी न करता केवळ धनादेशाद्वारे रोकड लंपास केल्याचे उघडकीस आले.

उगलेने भासविले स्वत:ला संचालक
उगले याने स्ट्रर्लिंग मोटर्स, फ्युचर्स कार या नामांकित दालनाचे स्वत:ला संचालक (प्रोप्रायटर) भासवून नामको बॅँकेकडून विविध वाहन खरेदीसाठी घेतलेले धनादेश अनुक्रमे २० लाख ८५ हजार, ८ लाख ५० हजार, ११ लाख ४० हजार रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सदर धनादेश उगले याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने संगनमताने स्वत:च्या पाथर्डीफाटा येथील स्टेट बॅँक आॅफ हैदराबादच्या शाखेतून वठविले. यावेळी त्याने स्वत:ला वरील मोटार विक्रीच्या दालनाचा संचालक असल्याचे भासविले व परस्पर रक्कम काढून बॅँकेची फसवणूक केली. या प्रकरणामध्ये बॅँकेच्या कर्मचा-यांसह अधिका-यांवरही पोलिसांना संशय असून, त्यांचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. उगले याने वरील मोटार विक्री करणा-या दालनांच्या नावाने बनावट व नावांशी साम्य असलेले कार्यालयही उघडले होते, असे समजते.

Web Title: NAMCO GETS 41 LAKHS TO BANK: The names used by cars dealers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.