Morning attendance in Nashik schools, decision to send parental school to school | नाशकातील शाळांमध्ये सकाळी अत्यल्प उपस्थिती, दुपारच्या सत्रात कडकडीत बंद

ठळक मुद्देनाशिकच्या शाळांमध्ये सकाळी अत्यल्प उपस्थितीदुपारच्या सत्रात शाळांचा सूट्टी देण्याचा निर्णयपालकांनी मुलांना घरी ठेऊन घेतली खबरदारी

नाशिक : भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर अनेक पालकांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठविले नाही, तर काही खासगी वाहनचालकांनी शहरातील तणावपूर्ण वातावरण लक्षात घेऊन शाळेर्पयत पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा घरी पोहोचविण्याची भूमिका घेतल्याने शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती अत्यल्प दिसून आली.
भीमा कोरेगावच्या घटनेचे पडसाद नाशिकमध्येही उमटले असून, शहरातील दुकाने व बाजारपेठा बंद असताना शहरातील सकाळच्या सत्रतील शाळा मात्र सुरू होत्या. भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. परंतु या बंदच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने शाळा-महाविद्यालयांना कोणतीही सूचना केलेली नसल्याने बुधवारी (दि. 3) शहरातील बहुतांश शाळा सुरू होत्या. परंतु मंगळवारच्या तणावपूर्ण शांततेनंतर शहरातील बंदची स्थिती लक्षात घेऊन अनेक पालकांनी त्यांच्या पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला, तर काही खासगी वाहनचालकांनी विद्यार्थांना शाळेपर्यत आणल्यानंतर शहरातील स्थिती लक्षात घेऊन पुन्हा घरी सोडण्याचा निर्णय घेतला. काही पालकांनीही अशाच प्रकारे शाळेर्पयत येऊन मुलांना पुन्हा घरी घेऊन जाणे पसंत केले. त्यामुळे बुधवारी शहरातील विविध शाळांमध्ये विद्याथ्र्याची उपस्थिती अत्यल्प होती. तर काही शाळांनी मुख्याध्यापकांच्या अधिकारात शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शाळांच्या परिसरात शुकशुकाट दिसून येत आहे.

दुपारच्या सत्रात सुटी

बंदच्या पूर्वसंध्येला शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालयांना सुटी नसल्याचे सरकारकडून सांगण्यात आल्याने बुधवारी सकाळी शहरातील शाळा- महाविद्यालये सुरू होती. परंतु शहरात कडेकोट बंद पाळण्यात आल्याने दुपारच्या सत्रातील शाळांना सुटी देण्यात आली. त्यामुळे शाळांच्या आवारात दिवसभर शुकशुकाटच दिसून आला.