Mercury 10.2 degrees: Partial relief from the cold winter season of Nashik | पारा १०.२ अंशावर : कडाक्याच्या थंडीपासून नाशिककरांना अंशत: दिलासा
पारा १०.२ अंशावर : कडाक्याच्या थंडीपासून नाशिककरांना अंशत: दिलासा

ठळक मुद्देवातावरणात गारवा टिकून आहे. सुर्योदय होताच तीव्रता कमी झाली.

नाशिक : कडाक्याच्या थंडीपासून नाशिककरांना सोमवारी (दि.११) अंशत: दिलासा मिळाला. सकाळी किमान तापमानाचा पारा १०.५ अंशापर्यंत वर सरकला. रविवारी शहराचे किमान तापमान ५अंशावर होते. तापमानात वाढ झाल्याचे दिसत असले तरी नाशिकचा भौगोलिकदृष्ट्या विचार करता तापमान १३ अंशाच्या पुढे गेल्यानंतरच वातावरणात उष्मा जाणवतो.
पाच दिवसांपासून शहरात थंडीचा कडाका प्रचंड वाढला होता. शुक्रवारी (दि.९) हंगामातील सर्वाधिक नीचांकी ४ अंश इतकी किमान तापमानाची नोंद झाली. डिसेंबर महिन्यात शहराचा पारा ५.३ अंशापर्यंत खाली घसरला होता. जम्मू-काश्मिरमध्ये बर्फवृष्टीचा जोर वाढल्याने उत्तरेकडून येणारी शीतलहरीने महाराष्टÑाला सर्वाधिक प्रभावीत केले. थंड वारे अधिक वेगाने वाहू लागले होते. तसेच अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे थंडीचा जोर वाढला होता. त्यामुळे यावर्षी चक्क फेब्रुवारीमध्ये थंडीचा कडाका नागरिकांनी अनुभवला व सर्वाधिक नीचांकी किमान तापमान नोंदविले गेले. फेब्रुवारीपर्यंत थंडीची तीव्रता कमी झालेली असते आणि उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरूवात होते; मात्र यावर्षी ऋु तूमानाचे चक्र बदलल्याचा अनुभव नागरिकांना येऊ लागला आहे.
डिसेंबरच्या पंधरवड्यापासून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नाशिककरांना यंदा तीव्र थंडीचा सामना करावा लागला. त्यामुळे थंडीच्या कडाक्याने नागरिक जेरीस आले आहे.  वातावरणात उष्मा तयार होत नसल्यामुळे वातावरणात गारवा टिकून आहे. आठवडाभरापासून किमान तापमानासह कमाल तापमानदेखील घसरल्याने थंडीचा कहर नाशिकमधये अनुभवयास आला. सायंकाळपासूनच शेकोट्या पेटवू लागल्या होत्या. सोमवारी मात्र थंडीपासून काहीसा दिलासा मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान दिसून आले. पहाटे थंडीची तीव्रता जाणवत होती; मात्र सुर्योदय होताच तीव्रता कमी झाली. तीन दिवसांपासून दिवसभर जाणवणारा बोचरा वारा सोमवारी नागरिकांना जाणवला नाही. त्यामुळे थंडीपासून काही अंशी तरी दिलासा मिळाल्याची चर्चा नागरिकांत सुरू होती.


Web Title: Mercury 10.2 degrees: Partial relief from the cold winter season of Nashik
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.