वडाळावासीयांच्या नशिबी मातीमिश्रित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 01:19 AM2018-07-01T01:19:21+5:302018-07-01T01:19:36+5:30

पंधरवड्यापासून वडाळागावात विषाणुजन्य आजारांचा फैलाव झाला असताना मातीमिश्रित दूषित पाणीपुरवठा नागरिकांच्या नळांमधून झाल्याने संताप व्यक्त होत आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा हा गलथान कारभार रुग्णसंख्या वाढविण्यासाठी पूरक ठरणारा असल्याची चर्चा गावात सुरू होती.

 Malted water of the Wadalas | वडाळावासीयांच्या नशिबी मातीमिश्रित पाणी

वडाळावासीयांच्या नशिबी मातीमिश्रित पाणी

Next

नाशिक : पंधरवड्यापासून वडाळागावात विषाणुजन्य आजारांचा फैलाव झाला असताना मातीमिश्रित दूषित पाणीपुरवठा नागरिकांच्या नळांमधून झाल्याने संताप व्यक्त होत आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा हा गलथान कारभार रुग्णसंख्या वाढविण्यासाठी पूरक ठरणारा असल्याची चर्चा गावात सुरू होती. जणू वडाळावासीयांच्या पाचवीलाच अशुद्ध पाणीपुरवठा पुजलेला आहे की काय? असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला. महापालिकेच्या हद्दीत समावेश होऊन अनेक वर्षे लोटली तरी विविध मुलभूत सोयी-सुविधांसाठी वडाळावासीयांच्या नशिबी असलेला संघर्ष अद्याप ‘जैसे-थे’ आहे. पंधरवड्यापासून वडाळागाव परिसरात विषमज्वर, विषाणुजन्य सांधेदुखी, ताप, डोके दुखी, उलट्या, अतिसार अशा आजाराचे रुग्ण वाढले आहे. ‘लोकमत’मधून सातत्याने नागरिकांच्या या समस्येला वाचा फोडली जात असल्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने खडबडून जागे होत प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या; मात्र पाणीपुरवठा विभागाचा गलथान कारभार अद्याप थांबलेला नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शनिवारी (दि.३०) वडाळागावातील झीनतनगर, रजा चौक, राजवाडा, माळी गल्ली, गरीब नवाज कॉलनी, रामोशीवाडा, कोळीवाडा, गोपालवाडी या भागात मातीमिश्रित दूषित स्वरूपाचा पाणीपुरवठा तासभर झाला. साथीचे आजार व विषाणुजन्य आजाराचे रुग्ण वरील भागातूनच सर्वाधिक आढळले असून, याच भागाला पुन्हा दूषित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागल्याने आरोग्य धोक्यात सापडले आहे.
जलवाहिनी दुरुस्तीचे कारण
वडाळागाव परिसरात सकाळी झालेल्या दूषित पाणीपुरवठा जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे झाल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले; मात्र तब्बल तासभर नळांमधून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकही चक्रावले. नळ वाहते ठेवून रहिवाशांना शुद्ध स्वरूपाच्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागली.

Web Title:  Malted water of the Wadalas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी