संगमेश्वर : साधारण मनुष्यही प्रसंगी असाधारण कर्तृत्व करू शकतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणून सलीम शेख आहे. त्यांचे धाडस सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी येथे केले.
अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यातून स्वत: जखमी असताना प्रसंगावधान राखून बसमधील भाविकांचे प्राण वाचविणाºया सलीम शेख या बसचालकाचा येथील सम्राट मंडळ व हम हिंदुस्थानी एकता संघटनेने नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी पोद्दार यांनी आतंकवाद्यांपुढे कुठलाही भारतीय नागरिक झुकणार नाही व सलीम शेख यांनी कर्तव्यप्रति निष्ठा व्यक्त केल्याने राष्टÑीय एकतेचा चांगला संदेश दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
प्रारंभी सम्राट मंडळाचे प्रमुख सुभाष परदेशी यांनी मंडळाच्या २५ वर्षाच्या कार्याचा आढावा सादर केला. पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते खलील देशमुख यांनी इतिहास चुकीच्या पद्धतीने शिकविला जात आहे, असे सांगून मालेगाव-करांच्या हिंदू-मुस्लीम एकतेला सलाम केला. पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने यांनी मालेगावकरांच्या एकतेचे कौतुक केले. सलीम शेख यांनी साहसी काम करून हिंमत दाखविली व मिळालेल्या संधीचे सोने केले असल्याचे गौरवोद्गार काढले. यावेळी उपमहापौर सखाराम घोडके, नगरसेवक राजाराम जाधव, पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे, अशोक परदेशी, राजेंद्र भोसले, राजेश गंगावणे, रहीम शेख, सुनील वडगे, उमेश अस्मर, यादव साळुंके, मौलाना सिराज कासमी, मामकोचे व्हा. चेअरमन विठ्ठल बागुल, शंकर बागुल, प्रकाश वडगे उपस्थित होते.