कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे ‘गोदावरी गौरव’ घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:39 AM2018-01-21T00:39:12+5:302018-01-21T00:41:04+5:30

Kusumagraj Pratishthan's 'Godavari Gaurav' declared | कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे ‘गोदावरी गौरव’ घोषित

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे ‘गोदावरी गौरव’ घोषित

Next
ठळक मुद्दे सत्यशील देशपांडे, अमोल पालेकर, सुभाष अवचट यांचा समावेश१० मार्चला वितरण


 

 

नाशिक : येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दर एक वर्षाआड देण्यात येणाºया ‘गोदावरी गौरव’ या पुरस्कारांची घोषणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी शनिवारी (दि. २०) नाशकात पत्रकार परिषदेत केली आहे. यावर्षी गायक पंडित सत्यशील देशपांडे, समाजसेवक डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे, अभिनेता व दिग्दर्शक अमोल पालेकर, माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, चित्रकार सुभाष अवचट आणि नुकत्याच झालेल्या कमला मिल दुर्घटनेत अडकलेल्यांना जीवदान देणारे सुदर्शन शिंदे व महेश साबळे यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कृतज्ञतेचा नमस्कार केला जाणार आहे. येत्या १० मार्चला कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी मविप्रच्या कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात सायंकाळी ६ वाजता आयोजित सोहळ्यात पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
१९९२ पासून कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने विविध सहा प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाºया मान्यवरांना ‘गोदावरी गौरव’ने सन्मानित केले जात आहे. यंदाचे पुरस्काराचे चौदावे वर्ष आहे. दर एक वर्षाआड या पुरस्काराचे वितरण होते. २१ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावर्षी, गायन या प्रकारात गायक, संगीततज्ज्ञ, रचनाकार पंडित सत्यशील देशपांडे, लोकसेवा प्रकारात मेळघाट येथे आदिवासी जमातीत राहून सेवा बजावणारे दाम्पत्य डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे, नाट्य आणि चित्रपट प्रकारात मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते अमोल पालेकर, ज्ञान या प्रकारात मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, चित्र या प्रकारात आंतरराष्टÑीय ख्यातीचे चित्रकार सुभाष अवचट तसेच मुंबईत नुकत्याच घडलेल्या कमला मिल आगीच्या दुर्घटनेत सुमारे २०० लोकांचा जीव वाचविणारे पोलीस आणि गृहरक्षक दलाचे जवान सुदर्शन शिंदे व महेश साबळे यांना ‘गोदावरी गौरव’ने सन्मानित केले जाणार आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते या मान्यवरांना कृतज्ञतेचा नमस्कार केला जाणार आहे. यापूर्वी, कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाºया जनस्थान आणि गोदावरी गौरव पुरस्कारांची घोषणा मुंबईत करण्याचा पायंडा विश्वस्तांनी पाडला होता. यंदा मात्र, तात्यासाहेबांच्या गावीच पुरस्कारांची घोषणा करण्याचे उशिराचे भान विश्वस्तांना आले. पत्रकार परिषदेप्रसंगी प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे, विश्वस्त संजय पाटील, आमदार हेमंत टकले, लोकेश शेवडे, विश्वास ठाकूर, विनायक रानडे, अरविंद ओढेकर आदी उपस्थित होते.
यंदा थोरात सभागृहात वितरण
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने जनस्थान असो अथवा गोदावरी गौरव या पुरस्कारांचे वितरण महाकवी कालिदास कलामंदिरात समारंभपूर्वक करण्यात येते. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून कालिदास कलामंदिराचे नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने यंदा कालिदास ऐवजी मविप्र शिक्षण संस्थेच्या कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात सायंकाळी ६ वाजता वितरण सोहळा होणार आहे.

Web Title: Kusumagraj Pratishthan's 'Godavari Gaurav' declared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक