Kocaten's friendly fight, Godse's problem! | कोकाटेंच्या मैत्रीपूर्ण लढतीमुळे गोडसेंची अडचण!
कोकाटेंच्या मैत्रीपूर्ण लढतीमुळे गोडसेंची अडचण!

नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनी नाशिक मतदारसंघात बंडखोरी केल्यानंतरही पक्षाने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात हात आखडता घेतल्याने कोकाटेंची ही बंडखोरी की मैत्रीपूर्ण लढत, असा प्रश्न युतीच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. कोकाटे यांच्या या कथित मैत्रीपूर्ण लढतीमुळे शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून भाजपने अगोदरच तयारी केली होती. परंतु नंतर शिवसेनेशी युती झाल्यानंतर वातावरणच बदलले. युतीकडून विद्यमान खासदाराला उमेदवारी मिळणे अपेक्षितच होते. परंतु अ‍ॅड. कोकाटे हे थांबण्यास तयार नव्हते. पक्षाने सांगितले म्हणून लोकसभा निवडणुकीची तयारी केली आता कार्यकर्त्यांना काय सांगू, असा प्रश्न करीत त्यांनी निवडणूक लढणारच असे जाहीर केले. त्याचवेळी त्यांनी आपण पक्षाकडे मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव देणार आहोत, तो मान्य झाल्यास ठीक अन्यथा अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर कोकाटे यांनी बंडखोरी केली; परंतु पक्षाने मात्र अद्याप त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्याने ही मैत्रीपूर्ण लढत आहे की काय, असा प्रश्न शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.
सुरुवातीला कोकाटे यांचे मन वळविले जाईल, मग ते माघार घेतील, असा अंदाज शिवसैनिक बांधत होते. कोकाटे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर जाहीरसभा घेऊन त्याच दिवशी भूमिका जाहीर केली असली तरी आता माघारीची मुदत संपूनही तीन दिवस उलटले; परंतु पालकमंत्री गिरीश महाजन यांची ‘शस्रक्रिया’ यशस्वी ठरली नाही की कोकाटे यांना अभय दिले गेले, असा हा प्रश्न निर्माण झाला आहे.
म्हणूनही कार्यकर्ते पडले संभ्रमात
४अ‍ॅड. कोकाटे यांनी निवडणुकीत बंडखोरी केल्यानंतर घेतलेल्या सभेत राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली होती. परंतु भाजपवर मात्र त्यांनी सौम्य टीका केली. कोकाटे यांच्या या भूमिकेमुळे त्यांना भाजपचे पाठबळ आहे काय अशीदेखील शंका शिवसैनिक उपस्थित करीत आहेत.
कोकाटे यांच्याबद्दल अद्याप एकाही भाजप नेत्याने उघडपणे त्यांच्याविरुद्ध टीका केलेली नाही. त्यामुळे कोकाटे यांना भाजपचे आतून समर्थन आहे की काय, अशीही चर्चा सुरू आहे. मात्र, कोकाटे यांच्या कथित मैत्रीपूर्ण लढतीने हेमंत गोडसे यांच्या अडचणीत भर पडली आहे.


Web Title:  Kocaten's friendly fight, Godse's problem!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.