नाशकात कामे केली मनसेने, श्रेय घेतले स्मार्ट सिटी कंपनीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 08:11 PM2017-12-28T20:11:20+5:302017-12-28T20:13:12+5:30

कंपनीच्या वार्षिक सभेत सादरीकरण : मनसेच्या भूमिकेकडे लक्ष लागून

 Karti MNS, doing work in Nashik, is credited with Smart City Company | नाशकात कामे केली मनसेने, श्रेय घेतले स्मार्ट सिटी कंपनीने

नाशकात कामे केली मनसेने, श्रेय घेतले स्मार्ट सिटी कंपनीने

Next
ठळक मुद्देसरकारवाड्याचे नूतनीकरण हे पुरातत्व खात्याच्या पाठपुराव्याने झालेले आहे वस्तू संग्रहालय, ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क, उड्डाणपुलाखालील सुशोभिकरण, पांडवलेण्याच्या पायथ्याशी असलेले वनौषधी उद्यान हे मनसेच्या सत्ताकाळात राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून सीएसआर उपक्रमांत उभे

नाशिक - मागील पंचवार्षिकमध्ये मनसेच्या सत्ताकाळात वनौषधी उद्यान, ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्कपासून ते होळकर पुलावरील वॉटर कर्टनपर्यंतची कामे ही स्मार्ट सिटीसाठी केंद्र सरकारला सादर केलेल्या आराखड्यातच समाविष्ट होती. कंपनी स्थापन होण्यापूर्वी महापालिकेने ती राबविली, असा दावा नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनने केला आहे. कामांचे श्रेय घेण्याच्या या प्रकाराबद्दल मनसेच्या भूमिकेकडे आता लक्ष लागून आहे.
नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पाेरेशनची पहिली वार्षिक सभा गुरुवारी (दि.२७) झाली. त्यावेळी, कंपनी स्थापन झाल्यापासून झालेल्या कामांचा आढावा सादर करण्यात आला. त्यात, अहल्यादेवी होळकर पुलावर वॉटर कर्टन (९५ लाख रुपये), घनकचरा व्यवस्थापन (१.४५ कोटी), सरकारवाडा नूतनीकरण (८.५ कोटी), गंगापूररोडवरील बाळासाहेब ठाकरे इतिहास वस्तू संग्रहालय (२ कोटी), ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क (४ कोटी), उड्डाणपुलाखालील सुशोभिकरण (१.५० कोटी), नेहरू वनौषधी उद्यान (१२ कोटी), कालिदास कलामंदिर नूतनीकरण (९ कोटी), महात्मा फुले कलादालन नूतनीकरण(३.२ कोटी), नेहरू उद्यान पुनर्विकास (१.२० कोटी), विद्युत दाहिनी(२.७ कोटी), अशोक स्तंभ ते त्र्यंबकनाका स्मार्ट रोड (१६ कोटी), सोलर पॅनल बसविणे (४.५ कोटी) याशिवाय, पंडित पलुस्कर पुनर्विकास, सार्वजनिक शौचालयांची उभारणी, बहुमजली पार्कींग, सीसीटीव्ही यंत्रणा आदी कामांचा समावेश करण्यात आला. या कामांमध्ये सरकारवाड्याचे नूतनीकरण हे पुरातत्व खात्याच्या पाठपुराव्याने झालेले आहे तर इतिहास वस्तू संग्रहालय, ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क, उड्डाणपुलाखालील सुशोभिकरण, पांडवलेण्याच्या पायथ्याशी असलेले वनौषधी उद्यान हे मनसेच्या सत्ताकाळात राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून सीएसआर उपक्रमांत उभे राहिलेले आहे. ही वस्तुस्थिती असताना कंपनीने आपण स्वत: केलेल्या कामांच्या यादीत या कामांचा समावेश करत श्रेट लाटण्याचा प्रयत्न चालविला आहे. यासंदर्भातील वास्तव पत्रकारांनी अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर कंपनीवर महापालिकेचा असलेल्या नोडल अधिका-याने मात्र सदर कामे ही केंद्र सरकारला सादर केलेल्या आराखड्यातीलच असल्याचा दावा केला आहे. स्मार्ट सिटीचे आराखडा बनविण्याचे काम सुरू असताना मनपाने त्या कामांवर खर्च केला असला तरी ती स्मार्ट सिटीच्या यादीत होती, असेही या नोडल अधिका-याने स्पष्ट केले. त्यामुळे श्रेय लाटण्याच्या या प्रकाराला आता मनसे कशा पद्धतीने प्रत्युत्तर देते, याकडे लक्ष लागून असणार आहे.
दोन वर्षांत कामे दिसतील
कालिदासचे नूतनीकरण, नेहरु उद्यानाचा पुनर्विकास, फुले कलादालनाचे नूतनीकरण ही कामे महापालिकेने कंपनीकडे वर्ग केलेली आहेत. त्यानुसार कंपनीच्या निधीतून सदर कामे सुरू असल्याची माहिती कंपनीमार्फत देण्यात आली. दरम्यान, ब-याच प्रकल्पांच्या निविदा प्रक्रिया सुरू असून येत्या दोन वर्षांत बरीच कामे प्रत्यक्षात दिसू लागतील, असा विश्वास कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी व्यक्त केला आहे.

Web Title:  Karti MNS, doing work in Nashik, is credited with Smart City Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.