कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात मान्सूनपुर्व सरी; काजव्यांचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 02:38 PM2019-06-11T14:38:05+5:302019-06-11T14:47:15+5:30

रात्री १२ वाजेच्याअगोदर अभयारण्याच्या सीमेबाहेर पर्यटकांनी येणे गरजेचे असून त्यानंतर कोणी पर्यटक अभयारण्य क्षेत्रात वावरताना आढळून आल्यास वन्यजीव विभागाकडून कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश भंदारदरा, राजूर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना अंजनकर यांनी दिले आहे.

In Kalsubai-Harishchandragaad Wildlife Sanctuary; The decrease in the number of fungi | कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात मान्सूनपुर्व सरी; काजव्यांचे प्रमाण घटले

कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात मान्सूनपुर्व सरी; काजव्यांचे प्रमाण घटले

Next
ठळक मुद्देशनिवारी पर्यटकांच्या गर्दीने उच्चांक गाठलावृक्षराजीवर काजव्यांचा लखलखाट रात्री पहावयास मिळतोभारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात येतील

नाशिक : शहरापासून अवघ्या ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या नाशिकवन्यजीव विभागाच्या अखत्यारितीतील कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात सध्या काजव्यांची चमचम अनुभवयास येत आहे. आठवडाभरापासून काजव्यांची उत्पत्ती या भागात झालेली पहावयास मिळत आहे; मात्र रविवारी (दि.९) व सोमवारीदेखील पावसाने हजेरी लावल्यामुळे काजव्यांचे प्रमाण घटल्याची माहिती वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी दिली.
पुढील आठवडाभर काजवे काही प्रमाणात बघावयास मिळणार असल्याने पर्यटकांना महोत्सवांतर्गत अभयारण्यात सशुल्क प्रवेश दिला जाणार आहे; मात्र रात्री १२ वाजेच्याअगोदर अभयारण्याच्या सीमेबाहेर पर्यटकांनी येणे गरजेचे असून त्यानंतर कोणी पर्यटक अभयारण्य क्षेत्रात वावरताना आढळून आल्यास वन्यजीव विभागाकडून कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश भंदारदरा, राजूर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना अंजनकर यांनी दिले आहे.

निसर्गाचा अद्भूत आविष्कार सह्याद्रीच्या कुशीत अभयारण्य क्षेत्रात काहीसा विलंबाने अनुभवयास आला. मागील दोन दिवसांपासून भंडारदरा वनपरिक्षेत्रातील कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रविवारी (दि.१०) पर्यटकांची संख्या रोडावलेली होती; मात्र शनिवारी पर्यटकांच्या गर्दीने उच्चांक गाठला. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला येथील वृक्षराजीवर काजव्यांचा लखलखाट अंधा-या रात्री पहावयास मिळतो. काजव्यांच्या आकर्षणापोटी नाशिक, मुंबई, पुणे, अहमदनगरसह या जिल्ह्यांमधून तसेच गुजरात राज्यांमधील अहमदाबाद, सुरत, राजकोट जिल्ह्यांमधूनही पर्यटक हजेरी लावत आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक वन्यजीव विभागाकडून अभयारण्यक्षेत्रात पाळावयाच्या नियमावलीच्या पत्रकांचे भंडारदरा-मुतखेल, शेंडी-घाटघर नाक्यांवर वाटप करण्यात येत आहे. तसेच या परिसरात जागृतीपर सूचना फलकही उभारण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणा-या टवाळखोरांसह हौशी हुल्लडबाजांवर कारवाईचे आदेश दिल्याचे अंजनकर यांनी सांगितले. याबाबत राजूर पोलीस निरीक्षकांसह अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही पत्र वन्यजीव विभागाकडून पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांनी काजव्यांचा सुरक्षित अंतरावरून आनंद लुटावा, काजवे पकडण्याचा किंवा ज्या झाडांवर काजवे चमकत आहे, त्या झाडांवर माती, दगड आदी वस्तू फेकण्याचा प्रयत्न अजिबात करू नये, अन्यथा साध्या वेशातील स्वयंसेवकांद्वारे संबंधित पर्यटकांच्या वाहनांचे क्रमांक गस्ती पथकाला कळवून त्यांच्यावर दंडात्मक तसेच भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

या नियमांचे करावे काटेकोर पालन

  • रात्री ९ वाजेपूर्वी अभयारण्यात प्रवेश करावा.
  • रात्री १२ वाजेच्या अगोदर अभयारण्य क्षेत्र तत्काळ सोडावे.
  • अभयारण्यातील मुख्य रस्ता सोडून वृक्षराजीमध्ये जाणे टाळावे.
  • अभयारण्य क्षेत्रात वावरत आहोत, याचे भान ठेवावे, जेणेकरून वन्यप्राण्यांकडून कोणालाही दुखापत होणार नाही.
  • झाडांपासून सुरक्षित अंतरावर थांबून काजव्यांचे निरीक्षण करावे.
  • काजव्यांना धोका होईल असे वर्तन करू नये.
  • अभयारण्यात येताच वाहनांचे दिवे मंद ठेवावे.
  • अनावश्यकरीत्या हॉर्नचा वापर करू नये.
  • स्वत:जवळ ज्वलनशील पदार्थ बाळगू नये.
  • वनविभाग व पोलीस गस्त पथकाला सहकार्य करावे.
     

Web Title: In Kalsubai-Harishchandragaad Wildlife Sanctuary; The decrease in the number of fungi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.