लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत महापालिकेने महाकवी कालिदास कलामंदिरच्या नूतनीकरणाचा निर्णय घेतला असून, त्याचा ई-शुभारंभ बुधवारी (दि.१९) सकाळी १०.३० वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीने पुनर्विकास प्रकल्पांतर्गत महाकवी कालिदास कलामंदिरच्या नूतनीकरणासाठी ९ कोटी २५ लाख रुपये मंजूर केले आहेत. त्यानुसार, नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले असून, त्यासाठी कालिदास कलामंदिर दि. १६ जुलैपासून बंद ठेवण्यात आले आहे.
स्मार्ट सिटी अभियानांतर्गत होणाऱ्या या नूतनीकरणाच्या कामाचा ई-शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. सदर कार्यक्रम महापालिका मुख्यालयात रेकॉर्ड हॉलमध्ये करण्यात येणार असून, याचवेळी अमृत अभियानांतर्गत तवली फाटा व दसक येथे साकारण्यात येणाऱ्या उद्यानाचेही भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.