ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 17 - नाशिककरांनी माझ्यावर मागील पंचवार्षिक निवडणुकीत जो विश्वास दाखविला त्यांचा विश्वास मी सार्थ ठरविला. मी पाच वर्षांत जी कामे केली ती नाशिककरांपुढे सादर केली. आता नाशिककरांना खरा निर्णय घ्यायचा आहे. भ्रष्टाचाऱ्यांच्या हातात शहर सोपवायचं की प्रगतीच्या वाटेवर शहराला गतिमान करायचं हे नाशिककरांनी ठरवावं, असे भावनिक आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी केले. भाजपा, शिवसेनेच्या हातात जर शहराची सत्ता गेली तर नाशिकचा सत्यानाश झाला समजा, असे भाकित राज ठाकरे यांनी जाहीर सभेत वर्तविले.
नाशिक शहरातील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित जाहीर सभेत राज ठाकरे बोलत होते. यावेळी ठाकरे म्हणाले, चांगल्या शहरांचा सत्यानाश करण्याचे काम भाजपा, सेनेचे आहे, ते माझे नाही. या शहराची सत्ता जर भाजपा-सेनेच्या हाती गेली तर शहराची ‘वाट’ लागली समजा. शहराचं भविष्य घडवायचं असेल तर ‘इंजिन’शिवाय नाशिकला पर्याय नाही. दादासाहेब फाळके यांच्या स्मारकाचा ‘बॉलिवूड’ला हेवा वाटेल असे स्मारक मी साकारून दाखविणार. माझ्याकडे दृष्टी आहे, मला शहरं सुंदर करण्याची आवड असून, मी टेंडरमधून पैसे खात नाही आणि खाऊही देत नाही. भ्रष्टाचार करू दिला नाही म्हणून तर अनेकांनी पक्ष सोडला. जनतेच्या पैशातून मलिदा लाटणाऱ्यांची राज ठाकरेला गरजही नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे :

शहरातल्या नागरिकांना उत्तम सोयी सुविधा देणं, ती सुंदर बनवणं, घडवणं हे माझं पॅशन आहे
नाशिकमध्ये ५ वर्षांत ५६० किलोमीटरचे रस्ते तयार केले
नाशिकच्या पुढच्या ४० वर्षांचा पाण्याची गरज भागवण्यासाठी मुकणे धरणातून थेट पाईपलाईन टाकली आहे. २० लाख लिटर्सच्या १७ टाक्या उभारल्या
डम्पिंग ग्राउंडचा त्रास जसा इतर शहरात असतो, तसा नाशिकमध्ये पण होता, पण आम्ही तिथे घनकचऱ्यातून खत प्रकल्प उभारला
नाशिकमध्ये कचरा उचलण्यासाठी जीपीएस यंत्रणेने सुसज्ज घंटागाड्या धावू लागल्यात
नाशिकमध्ये लहान मुलांना ट्रॅफिकचे धडे मिळावेत म्हणून 'चिल्ड्रेन ट्रॅफिक एज्युकेशन पार्क' उभारलं
मा.बाळासाहेबांचं स्मारक कोणी पहिलं केलं या वादात मला जायचं नाही. मला जे योग्य वाटलं ते स्मारक नाशिकमध्ये उभारलं
मा. बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं नाशिकमध्ये ऐतिहासिक शस्त्र संग्रहालय उभारलं
शिवाजी महाराजांच्या जगदंबा तलवारीची प्रतिकृती मा.बाळासाहेब ठाकरे ऐतिहासिक शस्त्र संग्रहालयात आहे
बोटॅनिकल गार्डनचा कायापालट व्हावा यासाठी रतन टाटांना अर्थसहाय्य करण्याची विनंती केली.त्यांनी तात्काळ मान्यता देत, १४ कोटी रुपये दिले
गोदावरी नदीच्या काठी गोदापार्क उभारावं म्हणून मुकेश अंबानींशी बोललो आणि त्यांनी होकार देत गोदापार्कच्या प्रकल्पाला निधी उपलब्ध करून दिला
नाशिकमध्ये उड्डाणपुलाच्या खाली एल अँड टी कंपनीशी बोलून संपूर्ण सुशोभीकरण करून घेतलं. त्यामुळे कोणतंही अतिक्रमण तिथे होत नाही
नाशिकमध्ये होळकर ब्रिजवर सुंदर वॉटर कर्टन उभारला.