कुटुंब नियोजनासाठी आलेल्या ३७ महिलांना घरचा रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 01:41 AM2019-03-10T01:41:45+5:302019-03-10T01:42:52+5:30

दोडी ग्रामीण रुग्णालय व पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कुटुंब नियोजन शस्रक्रियेसाठी तालुक्यातून आलेल्या ३७ महिलांना शस्रक्रिया न करताच माघारी पाठविल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. ८) दोडी ग्रामीण रुग्णालयात घडला. शस्रक्रियेसाठी अगोदर नकार नंतर होकार आणि पुन्हा नकार देण्याचा अजब प्रकार रुग्ण व नातेवाइकांनी अनुभवला. या प्रकारातून महिला रुग्ण व नातेवाइकांना मनस्ताप सहन करण्याची वेळ आली.

Home road for 37 women coming out of family planning | कुटुंब नियोजनासाठी आलेल्या ३७ महिलांना घरचा रस्ता

कुटुंब नियोजनासाठी आलेल्या ३७ महिलांना घरचा रस्ता

Next
ठळक मुद्देआरोग्य खात्याचा ‘पोरखेळ’ डॉक्टर आले उशिराने; नातेवाइकांचा संताप

सिन्नर : दोडी ग्रामीण रुग्णालय व पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कुटुंब नियोजन शस्रक्रियेसाठी तालुक्यातून आलेल्या ३७ महिलांना शस्रक्रिया न करताच माघारी पाठविल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. ८) दोडी ग्रामीण रुग्णालयात घडला. शस्रक्रियेसाठी अगोदर नकार नंतर होकार आणि पुन्हा नकार देण्याचा अजब प्रकार रुग्ण व नातेवाइकांनी अनुभवला. या प्रकारातून महिला रुग्ण व नातेवाइकांना मनस्ताप सहन करण्याची वेळ आली.
दोडी ग्रामीण रुग्णालयात शनिवारी (दि. ९) लेप्रोस्कोपी (स्री बिनटाका शस्रक्रिया) शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी तालुकाभर जनजागृती करण्यात आली होती. तालुकाभरातून शुक्रवारी दोडी ग्रामीण रुग्णालयात १२६ महिला सदर कुटुंब नियोजन शस्राक्रिया करण्यासाठी अ‍ॅडमिट झाल्या होत्या. शुक्रवारी या सर्व महिलांची रक्त तपासणी व अन्य टेस्ट करण्यात आल्या. त्यानंतर शनिवारच्या शस्रक्रियेसाठी त्यांना तयार करण्यात आले.
शनिवारी सकाळी ९ वाजता शस्रक्रिया होणार होती. यासाठी श्रीरामपूर येथून तज्ज्ञ डॉक्टर येणार होते. मात्र ते दोडीला दुपारी १ वाजता आले. रुग्णांची गर्दी पाहून त्यांनी सीझर झालेल्या महिलांची शस्रक्रिया करण्यास नकार दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अशा ३७ महिलांना घरी जाण्याचा सल्ला दुपारी देण्यात आला. जर शस्रक्रिया करायचीच नव्हती तर आम्हाला दोन दिवस अ‍ॅडमिट का केले, असा संतप्त सवाल रुग्णांनी उपस्थित केला.
नातेवाइकांनी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांच्यासोबत संपर्क साधून तक्रारी केल्या. सांगळे व डॉ. डेकाटे दुपारी २ वाजता दोडी ग्रामीण रुग्णालयात आल्यानंतर चर्चेतून सर्व महिलांच्या शस्रक्रिया करण्याचा निर्णय झाला. डॉ. डेकाटे यांनी रात्री उशीर झाला तरी सर्व रुग्णांच्या शस्रक्रिया करण्याचे आश्वासन दिले. शस्रक्रियेसाठी अगोदर नकार आणि पुन्हा होकार दिल्यानंतर नातेवाईक व रुग्ण थांबून राहिले. तोपर्यंत वैद्यकीय टीमने नॉर्मल असलेल्या महिलांच्या ७३ शस्रक्रिया पूर्ण केल्या. सायंकाळी ५ वाजता वैद्यकीय टीमने जेवणासाठी ब्रेक घेतला. त्यानंतर उर्वरित ३७ महिलांच्या शस्रक्रिया करण्याचे ठरले. मात्र सायंकाळी ६ वाजता अचानक निर्णय बदलला आणि ३७ महिलांना घरी जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे नातेवाइकांनी पुन्हा संताप व्यक्त करीत घरचा रस्ता धरला.
...नंतर बदलला निर्णय
शनिवारी दुपारी ३७ महिलांना शस्रक्रिया होणार नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर नातेवाइकांच्या तक्रारीनंतर जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, सदस्य नीलेश केदार दोडी ग्रामीण रुग्णालयात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्व शस्रक्रिया करण्याचे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष सांगळे यांच्यासमोर नातेवाइकांना दिले. मात्र सांगळे जाताच सायंकाळी पुन्हा शस्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय झाल्याची चर्चा रंगली.

Web Title: Home road for 37 women coming out of family planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.