ठळक मुद्दे विधीवत पूजा करुनच धार्मिक स्थळ हटविले जात आहे प्रमुख बाजारपेठ असलेल्या मेनरोड, रविवारकारंजा,भद्रकाली, शिवाजीरोड परिसरात बंदला संमीश्र प्रतिसाद

नाशिक- नाशिक महापालिकेने न्यायालयाच्या निर्देशानुसार दुसऱ्या  टप्प्यात आजपासून पुन्हा एकदा अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्यास प्रारंभ केला आहे. मोहिमेची सुरुवात सिडको विभागातून करण्यात आली असून आतापर्यंत चार धार्मिक स्थळे हटविण्यात आलेली आहेत. पोलिस बंदोबस्तात महापालिकेने कारवाई सुरू केली असून विधीवत पूजा करुनच धार्मिक स्थळ हटविले जात आहे. दरम्यान, महापालिकेच्या या कारवाईविरोधात मठ मंदिर बचाव समितीच्यावतीने आज नाशिक बंदची हाक देण्यात आली असून मेनरोडसह शहरातील बाजारपेठ परिसरात बंदला संमिश्र प्रतिसाद आहे.
महापालिकेने सन २००९ पूर्वीची परंतु रस्त्यांवर अडथळा ठरणारी १५० अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची तयारी केली आहे. त्यानुसार, अनधिकृत धार्मिक स्थळविरोधी कारवाईला सिडकोतून प्रारंभ करण्यात आला. पोलिस बंदोबस्तात धार्मिक स्थळे हटविण्याची कार्यवाही केली जात आहे. महापालिकेमार्फत धार्मिक स्थळे हटविण्यापूर्वी पुरोहितांमार्फत पूजाविधी केला जात असून त्यासाठी खास पुरोहितही नेमण्यात आला आहे. महापालिकेचे ३० कर्मचारी तैनात असून सहाही विभागाचे अधिकारी यांना प्राधिकृत म्हणून नेमण्यात आले आहे. धार्मिक स्थळ हटविल्यानंतर डेब्रीज उचलण्यासाठी बांधकाम विभागाने डम्पर उपलब्ध करुन दिले आहेत. दुपारनंतर सदर मोहीम सातपूर विभागात राबविली जाणार आहे. दरम्यान, मठ मंदिर बचाव समितीच्यावतीने आज नाशिक बंदची हाक देण्यात आली आहे. त्यानुसार, सकाळी मध्य नाशिक परिसरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या मेनरोड, रविवारकारंजा,भद्रकाली, शिवाजीरोड परिसरात बंदला संमीश्र प्रतिसाद आहे. समितीचे कार्यकर्ते व्यापाºयांना आपली दुकाने व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन करताना दिसून येत आहे. बाजारपेठ परिसरात पोलिस गस्तही वाढविण्यात आली आहे. दरम्यान, महापालिकेमार्फत सदर कारवाई येत्या १४ नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.