माडसांगवीत दारूबंदीचा ग्रामसभेचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 01:09 AM2019-06-23T01:09:10+5:302019-06-23T01:09:31+5:30

नाशिक तालुक्यातील माडसांगवी गावात दारूबंदीसाठी दोन दिवसांपूर्वी महिलांनी काढलेल्या मोर्चाची दखल घेत ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलावून गाव व परिसरात यापुढे थेंबभरदेखील दारू विकली जाणार नाही, असा दारूबंदीचा ठराव मंजूर केला आहे.

 Gramsabha resolution of Madasangita Vermicompost | माडसांगवीत दारूबंदीचा ग्रामसभेचा ठराव

माडसांगवीत दारूबंदीचा ग्रामसभेचा ठराव

Next

एकलहरे : नाशिक तालुक्यातील माडसांगवी गावात दारूबंदीसाठी दोन दिवसांपूर्वी महिलांनी काढलेल्या मोर्चाची दखल घेत ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलावून गाव व परिसरात यापुढे थेंबभरदेखील दारू विकली जाणार नाही, असा दारूबंदीचा ठराव मंजूर केला आहे.
शुक्रवारी झालेल्या या सभेसाठी गावातील शेकडोच्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी गावात व्यसनाधीनता वाढू दिली जाणार नसल्याचा संकल्प करण्यात आला. तसेच आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांनीही ग्रामसभेत सहभाग घेऊन दारूबंदी ठरावाला पूर्ण पाठिंबा दिला. माडसांगवी व परिसरात अवैध दारूधंदे बेसुमार वाढल्याने गावातील अल्पवयीन मुले, युवक व नागरिक मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी गेले आहेत, परिणामी गावात वेळोवळी अशांतता निर्माण होत आहे. त्यामुळे माळवाडी भागातील महिलांनी एकत्र येऊन दारूधंद्यावर दांडके मोर्चा नेला होता. गावात दारूबंदी जाहीर करावी यासाठी सरपंच तसेच आडगाव पोलिसांना निवेदन दिले होते. त्याची दखल घेत ग्रामपंचायतीने शुक्रवारी सकाळी ९ वाजता विशेष ग्रामसभेचे आयोजन केले. यावेळी महिला वर्गाने दारूबंदीचा ठराव मांडला. या ठरावावर ग्रामसभेत सविस्तर चर्चा होऊन एकमुखाने दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव राज्य शासनाला पाठवला जाणार आहे, असे सरपंच रेखा घंगाळे यांनी जाहीर केले. यावेळी उपसरपंच मीराताई पेखळे, ग्रामसेवक भामरे, हिरामण पेखळे, सुनंदा पेखळे, रंगनाथ जाधव, सुनील बर्वे, पंडित पेखळे, सुमनबाई अश्वरे, भोईर, बिडवे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, महिला, युवक, वारकरी उपस्थित होते.
ग्रामीण भागात दारूधंद्याला राजाश्रय असल्याने हे धंदे बंद करणे अवघड बनले होते. ही माफियागिरी मोडून काढण्यासाठी आता समाजातून विशेषत: महिलांनी पुढाकार घेऊन दारूबंदीसाठी एकजूट केली. त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. हा लढा कायम राहील.
- हिरामण पेखळे, अध्यक्ष, व्यसनमुक्ती व दारूबंदी समिती

Web Title:  Gramsabha resolution of Madasangita Vermicompost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.