पदव्युत्तर अभ्यासक्रमाला अखेर मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 01:09 AM2019-07-23T01:09:32+5:302019-07-23T01:10:29+5:30

आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकमध्ये असतानाही शहरात पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सुविधा नसल्याने विद्यापीठाकडून गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी प्रयत्न सुरू होते.

 Graduation of the postgraduate course | पदव्युत्तर अभ्यासक्रमाला अखेर मान्यता

पदव्युत्तर अभ्यासक्रमाला अखेर मान्यता

Next

नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकमध्ये असतानाही शहरात पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सुविधा नसल्याने विद्यापीठाकडून गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, आरोग्य विद्यापीठ आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संंयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालय व संदर्भ सेवा रुग्णालय येथे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याला शासनाने मान्यता दिली आहे.
नाशिकमध्ये पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सुरू केलेल्या प्रयत्नातून या विषयाला चालना मिळाली आणि आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकार्य केल्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा विषय मार्गी लागला आहे. या संदर्भात कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर म्हणाले, पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता मिळाल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एकूणच विद्यार्थीसंख्येत वाढ होणार आहे. सदर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय व विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील खाटा, रुग्णकक्ष,
शस्त्रक्रिया विभागांचा वापर करण्यात येणार असून, या संदर्भात आरोग्य विद्यापीठ व आरोग्य सेवा विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी यांचा पाठपुरावा महत्त्वपूर्ण ठरल्याचेही म्हैसेकर यांनी सांगितले. शासनाने या संदर्भातील शासन निर्णय सोमवार दि. २२ रोजी काढला असल्याची माहिती कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी दिली. विद्यापीठातर्फे सुरू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाकरिता अधिकच्या सर्व कंत्राटी सेवा तसेच शैक्षणिक उपक्रमासाठी येणारा सर्व प्रकारचा खर्च, वेतन इत्यादी बाबतची कार्यवाही वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत करण्यात येणार आहे. तसेच शैक्षणिक उपक्रमाकरिता जमा होणारे शुल्क, मिळणारा शासकीय निधी यांची व्यवस्था अधिष्ठाता बघणार आहेत. लवकरच डीएनबी अभ्यासक्रम सुरू करण्याकरिता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग सहकार्य करणार आहे. कुलगुरू डॉ. म्हैसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्रीचक्रधर मुंघल यांनी सदर प्रकल्प तयार केला असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली.
या पदव्युत्तर अभ्यासक्रमामुळे आरोग्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मोठा लाभ होणार असून, जागतिकस्तरावरील अद्ययावत शिक्षण घेण्याच्या वाटा उपलब्ध होणार आहेत. आरोग्य विद्यापीठाच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण घेता यावे यासाठी हे सकारात्मक पाऊल मानले जात आहे. यापूर्वी नाशिकच्या विद्यार्थ्यांना अन्य मोठ्या शहरात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी जावे लागत होते.
पालकमंत्र्यांचा शब्द खरा ठरला
आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा प्रस्तावाला पुढील आठवड्यात परवानगी मिळू शकते, अशी शक्यता वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मागील आठवड्यात दि.१४ रोजी जिल्हा आढावा बैठकीत जाहीरपणे वर्तविली होती. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पदव्युत्तर महाविद्यालयाचा प्रश्न निकाली काढण्याबाबतची ठाम भूमिका घेत त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाला प्रस्ताव दिल्याचे सांगितले होते. त्यानुसार आठ दिवसांत थेट शासन निर्णयच जाहीर झाला.

Web Title:  Graduation of the postgraduate course

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.